सिंधुदुर्गनगरी : भारतीय संविधान दिनाचे औचित्य साधून सिंधुदुर्ग जिल्ह्यात सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागांतर्गत सहायक आयुक्त, समाज कल्याण कार्यालयाच्या वतीने ‘संविधान दिंडी’चे उत्साहात आयोजन करण्यात आले. जिल्हाधिकारी कार्यालय, सिंधुदुर्ग येथून या दिंडीचा उत्साहपूर्ण शुभारंभ करण्यात आला. या उपक्रमातून भारतीय संविधानातील समता, स्वातंत्र्य, बंधुता आणि सामाजिक न्याय या मूल्यांचा जागर करण्यात आला.
जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रांगणात जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. अपूर्वा बासुर यांचे निवासी उपजिल्हाधिकारी मच्छिंद्र सुकटे यांच्या हस्ते पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले. यावेळी डॉ. अपूर्वा बासुर आणि मच्छिंद्र सुकटे यांच्या हस्ते संविधानाच्या उद्देशिकेचे वितरण करण्यात आले. उपस्थित मान्यवर आणि नागरिकांनी संविधानाच्या उद्देशिकेचे सामूहिक वाचन करून संविधानिक मूल्यांचे पालन करण्याचा संकल्प केला. त्यानंतर डॉ. अपूर्वा बासुर यांच्या हस्ते हिरवा झेंडा दाखवून संविधान दिंडीला सुरुवात करण्यात आली.
जिल्हाधिकारी कार्यालय, ओरोस येथून निघालेली ही दिंडी डॉन बॉस्को हायस्कूल मार्गे छत्रपती शिवाजी महाराज पुतळा, ओरोस येथे पोहोचली. दिंडीमध्ये विविध शाळा-महाविद्यालयांतील विद्यार्थी, नागरिक तसेच समाज कल्याण विभागाचे अधिकारी आणि कर्मचारी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.
या दिंडीचे विशेष आकर्षण ठरली ती भारतीय संविधानाची भव्य प्रतिकृती. विद्यार्थ्यांनी संविधानातील हक्क आणि कर्तव्यांची माहिती देणारे फलक हातात घेतले होते. ‘भारतीय संविधानाचा विजय असो’ अशा घोषणांनी संपूर्ण परिसर दुमदुमून गेला. संविधानातील लोकशाही मूल्ये केवळ पुस्तकांपुरती मर्यादित न राहता ती सर्वसामान्य नागरिकांपर्यंत आणि भावी पिढीपर्यंत पोहोचावीत, हा या उपक्रमामागील मुख्य उद्देश होता.
दरम्यान, छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याजवळ दिंडीची सांगता करण्यात आली. यावेळी समाज कल्याण विभागाचे विशेष अधिकारी तुषार गवळी आणि सहायक लेखाधिकारी उदय यादव यांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करण्यात आला. तसेच महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करून कार्यक्रमाचा समारोप करण्यात आला.
संविधानाच्या विचारांचा जागर, संविधानिक हक्क आणि कर्तव्यांची जाणीव तसेच सामाजिक समतेचा संदेश देणारी ही संविधान दिंडी सिंधुदुर्ग जिल्ह्यात उत्साहपूर्ण वातावरणात पार पडली.












