देशाच्या सुरक्षेसाठी नागरिकांनीही सतर्क राहावे; समुद्रकिनारी संशयास्पद हालचालींवर लक्ष ठेवण्याचे पोलीस निरीक्षक कमलेश बच्छाव यांचे आवाहन
कणकवली : मुंबईवर झालेल्या २६/११ दहशतवादी हल्ल्यात देशासाठी प्राणांची आहुती देणाऱ्या शूर जवान आणि पोलिसांना कणकवलीकरांनी भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली. गुरुवार, २६ नोव्हेंबर रोजी सायंकाळी कणकवली पोलीस ठाण्याच्या परिसरात मेणबत्त्या पेटवून हुतात्म्यांचे स्मरण करण्यात आले. यावेळी उपस्थित नागरिकांनी देशाच्या सुरक्षेसाठी एकजुटीने आणि सतर्कतेने काम करण्याचा संदेश दिला.
यावेळी बोलताना पोलीस निरीक्षक कमलेश बच्छाव यांनी कायदा व सुव्यवस्था अबाधित राखणे ही पोलिसांची जबाबदारी असून पोलीस आपले कर्तव्य सक्षमपणे पार पाडत असल्याचे सांगितले. नागरिकांनीही कायदा व सुव्यवस्थेला बाधा पोहोचेल असे कोणतेही कृत्य करू नये, असे आवाहन त्यांनी केले.
२६/११ चा दहशतवादी हल्ला सागरी मार्गाने झाल्याची आठवण करून देताना, भविष्यात अशा हल्ल्यांची पुनरावृत्ती टाळण्यासाठी समुद्रकिनारी राहणाऱ्या नागरिकांनी अधिक सतर्क राहणे आवश्यक असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. परिसरातील संशयास्पद हालचालींवर लक्ष ठेवून अशा बाबी निदर्शनास आल्यास तातडीने पोलिसांना माहिती द्यावी, असेही त्यांनी सांगितले. तसेच भारताची एकता आणि अखंडता संविधानामुळे टिकून असल्याचे प्रतिपादन त्यांनी केले.
ज्येष्ठ पत्रकार अशोक करंबेळकर यांनी यावेळी बोलताना सांगितले की, २६/११ दहशतवादी हल्ल्याला १८ वर्षे पूर्ण झाली आहेत. गेल्या १७ वर्षांपासून कणकवलीकर पोलीस ठाण्याच्या परिसरात मेणबत्त्या प्रज्वलित करून या हल्ल्यातील हुतात्म्यांना श्रद्धांजली अर्पण करत आहेत. देशाचे रक्षण करणाऱ्या सैनिक आणि पोलिसांप्रती कणकवलीकरांच्या मनात असलेली संवेदनशीलता या उपक्रमातून दिसून येते.
भारतावर भविष्यात अशा प्रकारचे हल्ले होऊ नयेत, यासाठी नागरिकांनी वैयक्तिक आणि राजकीय मतभेद बाजूला ठेवून देशाच्या सुरक्षेसाठी एकत्रितपणे काम करणे गरजेचे असल्याचे मतही त्यांनी व्यक्त केले.
या श्रद्धांजली कार्यक्रमाला पोलीस उपनिरीक्षक राजेंद्र नाणचे, महिला पोलीस उपनिरीक्षक वृषाली बर्गे, हवालदार पांडुरंग पांढरे, ज्येष्ठ पत्रकार अशोक करंबेळकर, गोपुरी आश्रमाचे प्रा. राजेंद्र मुंबरकर, प्रा. हरिभाऊ भिसे, काँग्रेस तालुकाध्यक्ष प्रदीप मांजरेकर, संदीप सावंत, तनोज कळसुलकर, संजय बेलवलकर, डॉ. सुहास पावसकर, गीतांजली कामत, शीतल मांजरेकर, अर्पिता मुंबरकर, विनायक उर्फ बाळू मेस्त्री, विनायक सापळे, प्रशांत बुचडे, सुनील दळवी, सचिन सादये, सदाशिव राणे यांच्यासह पोलीस कर्मचारी आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमाच्या प्रारंभी २६/११ हल्ल्यातील हुतात्म्यांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. त्यानंतर उपस्थितांनी भारतीय संविधानाच्या प्रास्ताविकेचे सामूहिक वाचन केले. विनायक मेस्त्री यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले.
हुतात्म्यांच्या बलिदानाचे स्मरण, संविधानाच्या मूल्यांचा जागर आणि देशाच्या सुरक्षेसाठी एकजुटीचा संदेश, अशा भावपूर्ण वातावरणात कणकवलीकरांचा हा श्रद्धांजली कार्यक्रम पार पडला.












