“कोकणातील खडकाळ मातीतही उद्योजकतेची बीजे रुजविण्याचे काम कौतुकास्पद”-आमदार प्रमोद जठार यांचे उद्योजक मेळाव्यात गौरवोद्गार

  • वैश्य ग्लोबल ट्रस्ट यांच्यावतीने वैश्य उद्योजकांचा मेळावा उत्साहात संपन्न

कणकवली : वैश्य समाजाच्या सर्वांगीण विकासाचा ध्यास घेऊन उद्योग, कला, क्रीडा, शैक्षणिक आणि सांस्कृतिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या वैश्य ग्लोबल चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीने सिंधुदुर्ग-रत्नागिरी जिल्ह्यातील वैश्य बांधवांचा उद्योजक मेळावा कणकवली तालुक्यातील हरकुळ बुद्रुक येथील कोकोनट रिट्रीट सभागृहात उत्साहात संपन्न झाला. वैश्य समाजातील उद्योजकांना एकत्र आणणे, नवउद्योजकांना प्रोत्साहन देणे आणि समाजाच्या आर्थिक व सामाजिक प्रगतीला चालना देणे हा या मेळाव्याचा मुख्य उद्देश होता.

वैश्य समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी कार्य करणारी जगातील एकमेव नोंदणीकृत संस्था म्हणून वैश्य ग्लोबल चॅरिटेबल ट्रस्टची ओळख असून, संस्थेचे आज सुमारे ७५० सदस्य आहेत. ‘एकच ध्यास, वैश्य समाजाचा विकास’ हे ब्रीद घेऊन संस्था विविध क्षेत्रांत कार्यरत आहे.

यावेळी प्रमुख उपस्थितीमध्ये आमदार प्रमोद जठार, माजी आमदार राजन तेली, नगराध्यक्ष संदेश पारकर, संस्थेचे संस्थापक अध्यक्ष डॉ. संतोष कामरेकर, उपाध्यक्ष दीपक मेजारी, सचिव सौ. रुपाली तेलवणे, खजिनदार संजय भाट, सहसचिव चंद्रकांत खाडये, विश्वस्त मनोज आंग्रे, विष्णू सातवसे आदी मान्यवरांसह जिल्ह्यातील अनेक उद्योजक व ज्ञाती बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.

यावेळी आमदार प्रमोद जठार यांनी आपल्या भाषणातून वैश्य ग्लोबल चॅरिटेबल ट्रस्टच्या कार्याचे विशेष कौतुक केले. ते म्हणाले, “बिज अंकुरे अंकुरे ओल्या मातीत मातीत, जसं रुजावे बियाणे माळरानी खडकात…” मुंबई, गुजरात, अहमदाबाद यांसारख्या ठिकाणी उद्योजकतेला पोषक वातावरण असल्याने तेथे अनेक उद्योगांची बीजे सहज रुजू शकतात. मात्र, कोकणासारख्या खडकाळ मातीत उद्योजकतेची बीजे रुजविण्याचे काम करणे हे खऱ्या अर्थाने कौतुकास्पद आहे. अशा प्रतिकूल परिस्थितीतही उद्योजक घडविण्यासाठी प्रयत्न करणाऱ्या वैश्य ग्लोबल ट्रस्टचे मी मनापासून आभार मानतो.

आपल्या मातीतल्या युवकांना उद्योजक बनविण्याचे महत्त्वपूर्ण काम ही संस्था करीत आहे. स्थानिक युवकांनी उद्योग-व्यवसायात स्वतःचे स्थान निर्माण केले, तर त्यांना रोजगारासाठी मुंबई-पुण्यासारख्या शहरांकडे धाव घ्यावी लागणार नाही. कोकणातील मुलांना कोकणातच मुलगी मिळेल, कारण तो आपल्या गावातच उद्योजक म्हणून सक्षमपणे उभा राहील, असे सांगत त्यांनी स्थानिक उद्योजकतेचा सामाजिक जीवनाशी असलेला संबंध अधोरेखित केला.

पुढे बोलताना जठार म्हणाले, “मीसुद्धा एक उद्योजक आहे. मी पहिला उद्योजक आणि नंतर राजकारणी आहे.” उद्योजकतेच्या माध्यमातून रोजगारनिर्मिती, आर्थिक स्वावलंबन आणि समाजाची प्रगती साधता येते. त्यामुळे युवकांनी नोकरीच्या मागे न लागता स्वतः उद्योजक होण्याचे स्वप्न पाहावे, असे आवाहनही त्यांनी केले.

वैश्य समाजातील उद्योजकांना एक व्यासपीठ उपलब्ध करून देणारा आणि नव्या पिढीला उद्योग-व्यवसायासाठी प्रेरणा देणारा हा मेळावा उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला. समाजातील एकता, सहकार्य आणि उद्योजकतेला चालना देण्याच्या दृष्टीने हा मेळावा महत्त्वपूर्ण ठरला.