श्री देव वेताळ देवस्थानच्या सर्वांगीण विकासासाठी जिल्हाधिकाऱ्यांची सकारात्मक भूमिका

  • सिंधुरत्न, ग्रामीण तीर्थक्षेत्र विकास योजनेतून विविध विकासकामांचा प्रस्ताव; जिल्हाधिकारी कार्यालयात सविस्तर बैठक

श्री. राजेश हेदळकर / कोकणशाही – सिंधुदुर्ग – कुडाळ : आरवली येथील श्री देव वेताळ देवस्थानच्या विविध विकासकामांसंदर्भात जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हाधिकारी श्रीमती तृप्ती धोडमिसे यांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण बैठक संपन्न झाली. यावेळी देवस्थानच्या धार्मिक व पर्यटनस्थळाच्या सर्वांगीण विकासाबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली. जिल्हाधिकाऱ्यांनी देवस्थानच्या विकासासाठी सकारात्मक प्रतिसाद देत आवश्यक सहकार्य करण्याचे आश्वासन दिले.

या बैठकीत सिंधुरत्न समृद्ध योजना, ग्रामीण तीर्थक्षेत्र विकास योजना तसेच धार्मिक पर्यटनस्थळांच्या विकासासंदर्भात चर्चा झाली. त्याचबरोबर देवस्थानच्या जमिनीच्या हस्तांतरणाचा विषयही चर्चेला आला.

श्री देव वेताळ देवस्थानचा विकास करण्यासाठी घाट बांधकाम, सुशोभीकरण, बहुउद्देशीय सभागृह, सुसज्ज स्वच्छतागृह, पाण्याची सुविधा, सौरऊर्जा प्रकल्प आदी विविध विकासकामांचे प्रस्ताव जिल्हाधिकाऱ्यांसमोर मांडण्यात आले. तसेच देवस्थानच्या जमिनीशी संबंधित विविध समस्यांबाबतही निवेदन सादर करण्यात आले.

देवस्थानच्या धार्मिक महत्त्वासोबतच या परिसराचा पर्यटनदृष्ट्या विकास झाल्यास भाविकांना अधिक चांगल्या सुविधा उपलब्ध होतील आणि स्थानिक पर्यटनालाही चालना मिळेल, अशी अपेक्षा यावेळी व्यक्त करण्यात आली.

या बैठकीला श्री देव वेताळ देवस्थान समितीचे चेअरमन श्री जयवंत राय, सचिव आबा टांककर, विश्वस्त श्री डॉ प्रसाद प्रभूसाळगावकर उपस्थित होते. त्यांनी देवस्थानच्या विकासासाठी आवश्यक असलेल्या विविध मागण्या जिल्हाधिकाऱ्यांसमोर मांडल्या.