तिरोडा-नाणोस पुलाला काही वर्षांतच तडे; सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर! ५ डिसेंबरपर्यंत दुरुस्ती न झाल्यास जनआंदोलनाचा इशारा!

सावंतवाडी : तिरोडा आणि नाणोस गावांना जोडणाऱ्या नदीवरील नव्याने बांधण्यात आलेल्या पुलाला अवघ्या काही वर्षांतच तडे गेल्याने पुलाच्या सुरक्षिततेचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. पुलावर सध्या एकेरी वाहतूक सुरू असून, धोकादायक ठिकाणी बॅरल लावून वाहतुकीवर निर्बंध घालण्यात आले आहेत. मात्र, अद्याप दुरुस्तीचे काम सुरू न झाल्याने ग्रामस्थांमध्ये नाराजी व्यक्त होत आहे.

या पुलाची संबंधित विभागाकडून पाहणी होऊन तब्बल चार महिने उलटले, तरीही प्रत्यक्ष दुरुस्तीला सुरुवात झालेली नाही. या पार्श्वभूमीवर जिल्हा परिषद सदस्य सुदन कवठणकर यांनी आक्रमक भूमिका घेत बांधकाम विभागाला जाब विचारला आहे.

५ डिसेंबरपर्यंत पुलाच्या दुरुस्तीबाबत ठोस कार्यवाही झाली नाही, तर ग्रामस्थांना सोबत घेऊन जनआंदोलन छेडण्यात येईल, असा स्पष्ट इशारा सुदन कवठणकर यांनी दिला आहे. तसेच पुलावरील बॅरल हटवून रस्ता वाहतुकीसाठी खुला करण्यात येईल, असा इशाराही त्यांनी संबंधित विभागाला दिला आहे.

दरम्यान, पुलाला गेलेले तडे, रखडलेली दुरुस्ती आणि सुरू असलेली एकेरी वाहतूक यामुळे तिरोडा-नाणोस परिसरातील नागरिकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे.

आता ५ डिसेंबरची मुदत जवळ येत असताना बांधकाम विभाग या प्रश्नावर कोणती ठोस भूमिका घेतो? पुलाच्या दुरुस्तीला प्रत्यक्ष सुरुवात होते का? की ग्रामस्थांना आंदोलनाचा मार्ग स्वीकारावा लागणार? याकडे तिरोडा-नाणोससह परिसरातील ग्रामस्थांचे लक्ष लागले आहे.