💫 पालकमंत्री नितेश राणे,भाजप जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत यांनी भाजप लोकप्रतिनिधी आणि मंडळ अध्यक्ष यांना दिले निर्देश.
💫 दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर घेतली ऑनलाईन मीटिंग
💫 दुष्काळाच्या संकटात शेतकरी एकटा नाही. देवेंद्र फडणवीस यांचे सरकार शेतकरी जनतेच्या पाठीशी
💫 आठही तालुके दुष्काळजन्य परिस्थितीच्या ‘ट्रिगर वन’मध्ये,दिली माहिती
कणकवली : प्रतिनिधी
महाराष्ट्रात दुष्काळजन्य परिस्थिती निर्माण होत असताना सिंधुदुर्ग जिल्ह्यातील आठही तालुक्यांचा दुष्काळजन्य परिस्थितीच्या ‘ट्रिगर वन’मध्ये समावेश करण्यात आला आहे. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे राज्यभर या संदर्भात दौरे सुरू झाले आहेत. सरकारने शेतकऱ्यांसाठी सवलतीच्या योजना जाहीर केल्या आहेत. या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांच्या संकट काळात जिल्ह्यातील भाजप जिल्हा परिषद, पंचायत समिती लोकप्रतिनिधी पदाधिकारी व भाजपा मंडळ अध्यक्ष यांनी प्रत्यक्ष शेतकऱ्यांच्या बांधावर पोचावे, त्यांच्याशी संवाद साधावा आणि त्यांना धीर द्या, देवा भाऊ चे सरकार शेतकऱ्यांच्या सोबत आहे याचा विश्वास द्यावा.असे निर्देश राज्याचे मत्स्य व्यवसाय व बंदरे विकास मंत्री तथा सिंधुदुर्गचे पालकमंत्री नितेश राणे आणि भाजपचे जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत यांनी जिल्ह्यातील जिल्हा परिषद, पंचायत समिती सदस्य, सभापती व पदाधिकाऱ्यांना दिले.
यासंदर्भात पालकमंत्री नितेश राणे यांनी लोकप्रतिनिधी,भाजप पदाधिकाऱ्यांची तातडीची ऑनलाईन बैठक घेतली. भाजप जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत यांच्यासह जिल्ह्यातील जिल्हा परिषद सदस्य पंचायत समिती सदस्य सभापती व लोकप्रतिनिधीनी या ऑनलाइन बैठकीत सहभाग घेतला. संभाव्य दुष्काळी परिस्थितीचा सामना करण्यासाठी प्रशासनासोबत लोकप्रतिनिधींनीही सक्रियपणे शेतकऱ्यांच्या बांधावर उतरावे, मात्र शेतकऱ्यांची हस्तेने विचारपूस करावी कोणताही बडे जाऊ त्यात असू नये अशा अशी अपेक्षा ही बैठकीत व्यक्त करण्यात आल्या.
“आता खरी जबाबदारी लोकप्रतिनिधींची” या भूमिकेतून प्रत्येक जिल्हा परिषद व पंचायत समिती सदस्याने आपल्या मतदारसंघातील गावांचा तातडीने दौरा करावा. शेतकऱ्यांच्या बांधापर्यंत पोहोचून त्यांच्या अडचणी समजून घ्याव्यात, नुकसानीची माहिती संकलित करावी आणि सरकारकडून मिळणारी मदत पात्र शेतकऱ्यांपर्यंत पोहोचण्यासाठी नियोजन करावे, असे निर्देश पालकमंत्री नितेश राणे यांनी दिले.
दुष्काळाच्या संकटात शेतकरी एकटा नाही. भाजप आणि महायुतीचे सरकार शेतकरी जनतेच्या पाठीशी ठामपणे उभे आहे. सरकारकडून जाहीर करण्यात येणाऱ्या विविध सवलती व मदतीची माहिती शेतकरी बांधवांपर्यंत पोहोचविण्याची जबाबदारीही लोकप्रतिनिधींनी पार पाडावी, असे आवाहन मंत्री नितेश राणे यांनी केले.
शेतकऱ्यांसोबत जनावरांचीही काळजी घ्या
दुष्काळाची झळ केवळ पिकांपुरती मर्यादित राहणार नसून त्याचा परिणाम शेतकरी, शेती आणि पशुधनावरही होण्याची शक्यता आहे. त्यामुळे आपल्या भागातील जनावरांच्या चाऱ्याची, पाण्याची तसेच पशुपालकांच्या अडचणींचाही लोकप्रतिनिधींनी आढावा घ्यावा, असे निर्देश देण्यात आले.
शेतकऱ्यांच्या डोळ्यांसमोर उभ्या पिकांचे नुकसान होत असताना त्यांना सरकारी मदतीची आणि आधाराची गरज आहे. अशा वेळी लोकप्रतिनिधींनी त्यांच्या सुख-दुःखात प्रत्यक्ष सहभागी होत “सरकार तुमच्या पाठीशी आहे” हा विश्वास निर्माण करणे आवश्यक आहे. त्यामुळे प्रत्येक लोकप्रतिनिधीने तातडीने दौरे सुरू करून शेतकरी बांधावर पोचावे, संवाद साधावा, त्यांच्या समस्या जाणून घ्याव्यात आणि त्या सोडविण्यासाठी पुढाकार घ्यावा, असे आवाहन या बैठकीत करण्यात आले.
दुष्काळाशी लढताना लोकप्रतिनिधी
सिंधुदुर्गातील सर्व आठही तालुके ‘ट्रिगर वन’मध्ये आल्याने आगामी काळात परिस्थितीवर बारकाईने लक्ष ठेवण्याची गरज आहे. संभाव्य दुष्काळाची तीव्रता, शेतीचे नुकसान, पाणीटंचाई, जनावरांच्या चाऱ्याचा प्रश्न आणि शेतकऱ्यांना आवश्यक असलेली मदत यांचा स्थानिक पातळीवर आढावा घेऊन प्रशासनापर्यंत वस्तुस्थिती पोहोचवावी. शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन त्यांचा आवाज ऐकणे आणि संकटाच्या काळात त्यांच्या पाठीशी उभे राहणे हीच लोकप्रतिनिधींची खरी भूमिका असल्याचे पालकमंत्री नितेश राणे यांनी स्पष्ट केले.












