वेंगुर्ला : तालुक्यातील अणसूर गावात गेल्या दीड वर्षापासून वाघाचा मुक्त संचार सुरू असून, आता दिवसाढवळ्याही वाघाचे दर्शन होऊ लागल्याने ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. या वाघाने आतापर्यंत सुमारे १५ ते २० गुरांचा फडशा पाडल्याचा दावा ग्रामस्थांकडून करण्यात येत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून, वनविभागाने तातडीने वाघाचा बंदोबस्त करावा, अशी मागणी सरपंच आणसूर यांनी केली आहे.
अणसूर गाव परिसरात वाघाचा वावर असल्याची माहिती वनविभागाला अनेक वेळा देण्यात आली. मात्र, वारंवार कळवूनही वनविभागाकडून अपेक्षित ती कार्यवाही होत नसल्याचा आरोप ग्रामस्थांकडून करण्यात येत आहे. गेल्या दीड वर्षात वाघाने अनेक पाळीव जनावरांवर हल्ला केल्याने शेतकऱ्यांना आर्थिक फटका बसला आहे.
वाघाच्या हल्ल्यात नुकसान झालेल्या काही शेतकऱ्यांना नुकसानभरपाईची रक्कम मिळाली असली, तरी काही नुकसानग्रस्तांना अद्यापही भरपाई मिळालेली नसल्याचे ग्रामस्थांचे म्हणणे आहे. त्यामुळे एकीकडे गुरांचे नुकसान आणि दुसरीकडे भरपाईसाठी करावी लागणारी धावपळ, अशा दुहेरी संकटाचा सामना शेतकऱ्यांना करावा लागत आहे.
विशेष म्हणजे, वाघाचा वावर आता मानवी वस्तीजवळही वाढल्याचे ग्रामस्थांचे म्हणणे आहे. रात्रीच्या वेळी वाघ वस्तीजवळ येत असल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. दिवसा शेतकऱ्यांची गुरे रानात चरायला असतात. याच काळात वाघाकडून गुरांवर झडप घातली जात असल्याने शेतकरी स्वतःही रानात जाण्यास घाबरत आहेत. वाघाच्या वाढत्या संचारामुळे केवळ पशुधनाचेच नव्हे, तर मानवी सुरक्षिततेचेही आव्हान निर्माण झाले आहे. शेतकरी, महिला आणि नागरिकांना रात्रीच्या वेळी घराबाहेर पडताना भीती वाटत आहे. त्यामुळे वनविभागाने केवळ पंचनामे आणि नुकसानभरपाईपुरती कार्यवाही न करता वाघाचा वावर रोखण्यासाठी ठोस उपाययोजना कराव्यात, अशी मागणी होत आहे.१५ दिवसांत वनविभागाने वाघाचा बंदोबस्त करून ग्रामस्थांना दिलासा दिला नाही, तर अणसूरमधील ग्रामस्थांना सोबत घेऊन वनविभागाच्या कार्यालयावर धडक मोर्चा काढण्यात येईल, असा इशारा सरपंच आणसूर यांनी दिला आहे.
वाघाच्या वाढत्या वावरामुळे अणसूरमधील ग्रामस्थ आणि शेतकरी चिंतेत असून, वनविभाग आता या गंभीर प्रश्नावर कोणती भूमिका घेतो आणि वाघाचा बंदोबस्त करण्यासाठी कोणती ठोस पावले उचलतो, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.












