कुडाळ : गणेश विसर्जन मिरवणूक म्हटली की डीजेचा कर्णकर्कश आवाज, वाढता ध्वनिप्रदूषणाचा त्रास आणि त्याचा लहान मुले, ज्येष्ठ नागरिक तसेच रुग्णांच्या आरोग्यावर होणारा परिणाम, हे चित्र गेल्या काही वर्षांत सर्वत्र पाहायला मिळत होते. मात्र यंदाच्या गणेश विसर्जन मिरवणुकीत कुडाळ शहराने या प्रथेपासून काहीसे वेगळे पाऊल टाकत ‘डीजेपेक्षा ढोल-ताशे’ या पारंपरिक संस्कृतीला प्राधान्य दिले. त्यामुळे यंदाची विसर्जन मिरवणूक केवळ गणेशभक्तीची नव्हे, तर सामाजिक जाणीवेचीही ठरली.
गणेश विसर्जनाच्या पार्श्वभूमीवर कुडाळ पोलीस प्रशासनाने डीजेच्या मोठ्या आवाजामुळे होणारा मानवी त्रास आणि ध्वनिप्रदूषणाचा विचार करून डीजे मालक तसेच विसर्जन मिरवणुकीत डीजेचा वापर करणाऱ्या गणेश मंडळांना डीजेचा वापर टाळण्याचे आवाहन केले होते. त्याऐवजी आपल्या पारंपरिक संस्कृतीचा वारसा जपत ढोल-ताशे, पारंपरिक वाद्ये आणि पारंपरिक पद्धतीने विसर्जन मिरवणूक काढावी, असे आवाहन कुडाळ पोलिस निरीक्षक विकास बडवे तसेच पोलीस प्रशासनाकडून करण्यात आले होते.
या आवाहनाला कुडाळ शहरातील गणेशभक्तांनी यंदा मोठ्या प्रमाणात सकारात्मक प्रतिसाद दिल्याचे पोलिसांनी सांगितले. दरवर्षीच्या तुलनेत यंदा डीजेचा वापर मोठ्या प्रमाणात कमी झाल्याचे दिसून आले. काही ठिकाणी किरकोळ स्वरूपात डीजेचा वापर झाला असला तरी बहुतांश गणेश मंडळांनी पारंपरिक ढोल-ताशांच्या गजरातच बाप्पाला निरोप देण्याला पसंती दिली.
विशेष म्हणजे, डीजेच्या वापराबाबत केवळ पोलिसांकडून निर्बंध अथवा कारवाईची भूमिका न घेता गणेशभक्तांनी स्वतःहून संयम दाखविला. मानवी आरोग्य आणि इतर नागरिकांना होणारा त्रास लक्षात घेऊन डीजेचा वापर कमी करण्याचा निर्णय गणेश मंडळांनी स्वतःहून घेतला, ही बाब यंदाच्या विसर्जन मिरवणुकीचे विशेष वैशिष्ट्य ठरली. विसर्जन मिरवणुकीत ढोल-ताशांचा निनाद, पारंपरिक वाद्यांचा ताल आणि गणपती बाप्पाच्या जयघोषाने वातावरण भक्तिमय झाले. मोठ्या आवाजाच्या डीजेऐवजी पारंपरिक वाद्यांना मिळालेल्या या पसंतीमुळे गणेशोत्सवातील भक्ती, परंपरा आणि सामाजिक भान यांचा सुंदर संगम पाहायला मिळाला.












