देवगडच्या कन्येची ऐतिहासिक कामगिरी! सुनेत्रा ढेरे यांना कमांडंट गोल्ड मेडल

देवगड : येथील महाविद्यालयातील भौतिकशास्त्र विभागाच्या प्राध्यापिका तथा ५८ महाराष्ट्र बटालियन एनसीसीच्या अधिकारी लेफ्टनंट सुनेत्रा ढेरे यांनी ग्वाल्हेर येथील एनसीसी ऑफिसर्स ट्रेनिंग अकॅडमीमध्ये पार पडलेल्या रिफ्रेशर कोर्समध्ये देशभरात प्रथम क्रमांक पटकावून ऐतिहासिक यश संपादन केले आहे. त्यांच्या या उल्लेखनीय कामगिरीबद्दल त्यांना मानाच्या ‘कमांडंट गोल्ड मेडल’ने सन्मानित करण्यात आले असून, या यशामुळे देवगड महाविद्यालयाच्या व संपूर्ण सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला गेला आहे. ग्वाल्हेर येथील अकॅडमीमध्ये ३१ ऑगस्ट ते १९ सप्टेंबर २०२६ या कालावधीत हा खडतर रिफ्रेशर कोर्स आयोजित करण्यात आला होता. या प्रशिक्षणात संपूर्ण देशभरातून ११७ एनसीसी अधिकारी सहभागी झाले होते. या कोर्सदरम्यान आपत्ती व्यवस्थापन, मॅप रीडिंग, रायफल ड्रिल यांसारख्या विविध कठीण विषयांचे प्रशिक्षण आणि प्रात्यक्षिके घेण्यात आली. यामध्ये उत्कृष्ट कामगिरी करत लेफ्टनंट सुनेत्रा ढेरे यांनी गुणवत्ता यादीत अव्वल स्थान पटकावले. केवळ सैनिकी प्रशिक्षणातच नव्हे, तर रायफल शूटिंग, सामाजिक उपक्रम आणि सांस्कृतिक कार्यक्रमांतही त्यांनी आपल्या अष्टपैलू व्यक्तिमत्त्वाची छाप पाडली. यापूर्वी २०२० मध्ये त्यांनी ग्वाल्हेर येथेच तीन महिन्यांचे खडतर प्रशिक्षण पूर्ण करून ‘प्री-कमिशन’ प्रमाणपत्र मिळवले होते आणि त्यानंतर त्यांना सैन्यातील ‘लेफ्टनंट’ पद मिळाले होते. आता या रिफ्रेशर कोर्समधील सर्वोत्कृष्ट कामगिरीच्या जोरावर त्यांना लवकरच ‘कॅप्टन’ ही पदोन्नती प्रदान करण्यात येणार आहे. त्यांच्या या यशाबद्दल ५८ महाराष्ट्र एनसीसीचे कमांडिंग ऑफिसर कर्नल अजयराज, अॅडम ऑफिसर लेफ्टनंट कर्नल तनुज मंडलिक, शिक्षण संस्थेचे पदाधिकारी, देवगड महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. विजयकुमार कुनुरे, सर्व प्राध्यापक, शिक्षकेतर कर्मचारी तसेच सिंधुदुर्ग जिल्ह्यातील विविध क्षेत्रांतील मान्यवरांकडून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.