देवगड : देवगड तालुक्यातील वाडा येथील भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक येथे लावण्यात आलेले महापुरुषांच्या अभिवादनाचे बॅनर अज्ञाताकडून फाडण्यात आल्याची घटना रविवारी सकाळी उघडकीस आली. त्यामुळे तेथील परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले. सदर घटनेचा निषेध व्यक्त करीत बौद्ध समाजाच्या भावना दुखावण्याच्या तसेच परिसरातील शांतता भंग करण्याच्या उद्देशाने हा प्रकार करण्यात आल्याचा आरोप समाजबांधवांनी करीत संशयिताविरुद्ध कठोर कायदेशीर कारवाईची मागणी केली.
अनोखी सामाजिक बांधिलकी घटनेचा पंचनामा झाल्यानंतर पोलीस प्रशासनाने जुने बॅनर सन्मानपूर्वक खाली उतरवून ताब्यात घेतले. पोलिसांनी नवे बॅनर उपलब्ध करून देत अनोखी सामाजिक बांधिलकी जपली. पोलिसांच्या बंदोबस्तातच तेथील समाज बांधवांनी नवा बॅनर तेथे लावला. दरम्यान, सदर घटनेचा निषेध करण्यासाठी आणि आरोपींवर कडक कारवाई व्हावी, या मागणीसाठी २४ ऑगस्ट रोजी सकाळी ११ वाजता वाडा डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक येथे निषेध सभेचे आयोजन करण्यात आले आहे.






