वेंगुर्ले : १५ ऑगस्टनंतर अधिकृत सागरी मच्छीमारी सुरुवात झाल्यानंतर रविवारी पहिल्यांदाच स्थानिक मच्छीमारांना मोठ्या प्रमाणात कोळंबी मिळाल्याने मच्छीमार सुखावला आहे. गेले काही दिवस फक्त बांगडा मासा व इतर बारीक मासे कमी प्रमाणात मिळत असल्याने मच्छीमार नाराज होता; मात्र रविवारी लहान कोळंबीपासून मोठ्या व्हाईट प्रॉन्स अशी कोळंबी मिळाल्याने दर्यावर्दी सुखावला असून किनाऱ्यावरचे लगबग वाढली आहे. तसेच मत्स्य खवय्यांनीही आपला मोर्चा समुद्राकडे वळवला असून थेट किनाऱ्यावर कोळंबी खरेदी-विक्री मोठ्या प्रमाणात चालू आहे. या कोळंबीला प्रतवारीनुसार २०० रु., ३०० रु., ४०० रु. प्रतिकिलो असा चांगला दर मिळाला, तर व्हाईट प्रॉन्सला प्रतिकिलो ५०० रुपये दर मिळाला.












