शेतकऱ्यांच्या बांधावर पालकमंत्री नितेश राणे; भातपिकाच्या नुकसानीचा घेतला आढावा

सावंतवाडी : तालुक्यातील मळगाव येथे देवेंद्र गावकर यांच्या शेतावर मंत्री मत्यव्यवसाय व बंदरे, महाराष्ट्र राज्य पालकमंत्री नितेश राणेंनी भेट देऊन भात पिकाची प्रत्यक्ष पाहणी केली. यावेळी शेतकऱ्यांशी संवाद साधून पिकाच्या सद्यस्थितीची माहिती घेतली. प्रदीर्घ पावसाचा खंड, वाढलेले ऊन आणि पाण्याची कमतरता यामुळे भात पिकाच्या वाढीवर परिणाम झाला आहे. काही ठिकाणी वाढ खुंटली असून फुटवे कमी लागले आहेत. लोंब्या न आल्याने किंवा आलेल्या लोंब्यांमध्ये दाणे पुरेशा प्रमाणात न भरल्याने उत्पादनावर परिणाम होण्याची शक्यता आहे. करपा रोगासाठी औषधांची फवारणी करूनही अपेक्षित परिणाम झाला नसल्याचे शेतकऱ्यांनी सांगितले. तसेच विहिरींच्या पाणी पातळीतही घट होत असल्याचेही निदर्शनास आले.
शेतपिकांची पाहणी करून नुकसानीचे पंचनामे अधिक वेगाने पूर्ण करून त्याबाबतची कार्यवाही तातडीने करण्याच्या सूचनाही दिल्या.
यावेळी जिल्हा परिषद अध्यक्ष प्रमोद कामत, जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे, मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. अपूर्वा बासूर, उपविभागीय अधिकारी विरसिंग वसावे, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी भाग्यश्री नाईकनवरे, लघू पाटबंधारे, जलसंधारण विभागाचे अधिकारी, जिल्हा परिषद अध्यक्ष प्रमोद कामत यांच्यासह स्थानिक ग्रामस्थ व संबंधित विभागांचे अधिकारी उपस्थित होते.