VGCT विश्वस्त व पदाधिकाऱ्यांच्या कोकण दौऱ्याला सिंधुदुर्गात उत्स्फूर्त प्रतिसाद

व्यवसायवृद्धी, नेटवर्किंग आणि उद्योजकतेचा प्रभावी मंत्र; नवीन सदस्यांसह गोल्ड मेंबरशिपचीही नोंद

सिंधुदुर्ग प्रतिनिधी : श्री संजय पेटकर
कणकवली : उद्योजकांना एकत्र आणत व्यवसायवृद्धी, प्रभावी नेटवर्किंग आणि परस्पर सहकार्याचा संदेश देणाऱ्या VGCT विश्वस्त व पदाधिकाऱ्यांच्या कोकण दौऱ्याअंतर्गत सिंधुदुर्ग पुष्पाचा कार्यक्रम सोमवारी सायंकाळी ५.३० वाजता जाणवली (कणकवली) येथील राधेश्याम बँक्वेट्स येथे अत्यंत उत्साहपूर्ण वातावरणात यशस्वीरित्या पार पडला. प्रेरणादायी मार्गदर्शन, सदस्यांचा उत्स्फूर्त सहभाग, नवीन सदस्यांची नोंदणी आणि गोल्ड मेंबरशिपमुळे हा कार्यक्रम विशेष ठरला.

या कार्यक्रमाला संस्थापक अध्यक्ष डॉ. संतोष कामेरकर, विश्वस्त विष्णू सातवसे, गिरीश कोळवणकर तसेच राज साडविलकर, आनंद कोळवणकर आणि संतोष भालेकर यांची प्रमुख उपस्थिती लाभली.

कार्यक्रमाची सुरुवात कुलदेवतेच्या स्मरणाने झाली. त्यानंतर आनंद कोळवणकर यांनी VGCT संकल्पनेची सविस्तर माहिती दिली. विश्वस्त विष्णू सातवसे यांनी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील संस्थेच्या भविष्यातील उपक्रमांची दिशा स्पष्ट केली. राज साडविलकर यांनी प्रेरणादायी मार्गदर्शन करून उपस्थितांना व्यवसायवृद्धीसाठी प्रोत्साहित केले. संतोष भालेकर आणि VGCT चे आधारवड गिरीश कोळवणकर तसेच सुशील खेडेकर यांनीही आपल्या अनुभवातून मोलाचे मार्गदर्शन केले.

यानंतर उपस्थित प्रत्येक सदस्याने आपल्या व्यवसायाचा परिचय करून दिला. पियुष पोकळे आणि शामसुंदर खातू यांनी आपल्या यशस्वी व्यावसायिक प्रवासाच्या प्रेरणादायी कथा सर्वांसमोर मांडल्या.

संस्थापक अध्यक्ष डॉ. संतोष कामेरकर यांनी अत्यंत खेळीमेळीच्या वातावरणात व्यवसायवृद्धी, नेटवर्किंग आणि उद्योजकतेविषयी प्रभावी मार्गदर्शन करून उपस्थितांना प्रेरित केले. त्यांच्या मार्गदर्शनाला उपस्थितांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डिस्ट्रिक्ट कोऑर्डिनेटर Ar. गणेश म्हसकर यांनी उत्कृष्टरीत्या पार पाडले, तर शृंगेरी केसरकर यांनी आभार प्रदर्शन केले.

या प्रसंगी राजेश सापळे यांची विशेष उपस्थिती लाभली.

कार्यक्रमाचे सकारात्मक फलित म्हणून अमित पारकर यांनी VGCT चे सदस्यत्व स्वीकारले, तर आनंद पारकर यांनी ₹३५,००० भरून तात्काळ गोल्ड मेंबरशिप घेतली.

कार्यक्रमासाठी कुंदन केसरकर यांनी आपला राधेश्याम बँक्वेट हॉल उपलब्ध करून दिला. त्यांच्या या सहकार्याबद्दल त्यांचे मनःपूर्वक आभार व्यक्त करण्यात आले.

कार्यक्रमाला सुनील कुडतरकर, हर्षदीप धवन, किरण पेडणेकर, नारकर सर, खाड्ये यांच्यासह अनेक सदस्य व मान्यवर उपस्थित होते.

सर्व मान्यवर, सदस्य आणि उपस्थितांच्या उत्स्फूर्त सहभागामुळे हा कार्यक्रम अत्यंत यशस्वी, प्रेरणादायी आणि संस्मरणीय ठरला. व्यवसायवृद्धी, परस्पर सहकार्य आणि उद्योजकतेला चालना देणाऱ्या VGCT च्या या कोकण दौऱ्याला सिंधुदुर्गात मिळालेला प्रतिसाद संस्थेच्या वाढत्या कार्याचा आणि विश्वासाचा ठसा उमटवणारा ठरला.