कणकवली : पर्यावरणाचा बिघडता समतोल सावरण्यासाठी आणि निसर्गाचे सौंदर्य जपण्यासाठी वृक्ष लागवड व वृक्षसंवर्धन ही आजच्या काळाची सर्वात मोठी गरज आहे, असे प्रतिपादन कणकवली तालुका पत्रकार संघाचे अध्यक्ष भगवान लोके यांनी केले. कणकवली तालुका पत्रकार संघाच्या वतीने सावडाव धबधबा परिसरात पर्यावरण संवर्धनाचा संदेश देत भव्य वृक्ष लागवड उपक्रम उत्साहात पार पडला, त्यावेळी ते बोलत होते.
कणकवली तालुका पत्रकार संघ हा केवळ बातमीदाराची भूमिका न बजावता सातत्याने विविध सामाजिक बांधिलकीचे उपक्रम राबवत असतो. गेल्या वर्षी पत्रकार संघातर्फे सावडाव धबधबा परिसरात विशेष स्वच्छता मोहीम राबवण्यात आली होती. त्याच धर्तीवर यंदा वाढते प्रदूषण, अनियंत्रित होणारी वृक्षतोड आणि बदलत्या हवामानाचे दुष्परिणाम रोखण्यासाठी पत्रकार संघाने सावडाव परिसरात वृक्षारोपणाचा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला. या उपक्रमाचा शुभारंभ सावडावच्या सरपंच आर्या वारंग यांच्या शुभहस्ते करण्यात आला.
सावडाव धबधबा हे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील अत्यंत लोकप्रिय पर्यटनस्थळ असून, या परिसराचे नैसर्गिक सौंदर्य आणि पर्यावरण अबाधित राखणे ही प्रत्येकाची सामूहिक जबाबदारी आहे, असा सूर या प्रसंगी उमटला.
पत्रकारिता क्षेत्रासोबतच निसर्गरक्षणासाठी पुढाकार घेणाऱ्या पत्रकार संघाच्या या उपक्रमाचे संपूर्ण तालुक्यातून कौतुक केले जात आहे.
या उपक्रमाला तालुका संघाचे अध्यक्ष भगवान लोके, जिल्हा उपाध्यक्ष संतोष राऊळ, सावडाव उपसरपंच दत्ता काटे, सचिव संजय सावंत, खजिनदार रोशन तांबे, जिल्हा कार्यकारिणी सदस्य लक्ष्मीकांत भावे, माजी अध्यक्ष रमेश जोगळे, अजित सावंत, चंद्रशेखर देसाई, महेश सरनाईक, सुधीर राणे, उमेश बुचडे, दर्शन सावंत, नितीन कदम, विशाल रेवडेकर, तुषार हजारे, तुषार सावंत, उत्तम सावंत, भाई चव्हाण, संजय बाणे, माणिक सावंत, उल्का तावडे, रंजिता तहसीलदार, संजय पेटकर हे पत्रकार उपस्थित होते. तसेच वनविभागाचे वनपाल सारिक फकीर, वनरक्षक अमोल पटेकर, अंकुश माने, स्वाती व्हनवडे, शुभम पाटील यांच्यासह तालुक्यातील पत्रकार, त्यांचे कुटुंबिय व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.










