कुडाळ : स्वतःच्या मालकीच्या जागेसाठी न्यायालयीन दाद मागण्याच्या मागणीला नकार देणाऱ्या कुडाळ नगरपंचायतीविरोधात हिंदू कॉलनी रहिवासी आणि कुडाळ शहर हितचिंतकांनी उच्च न्यायालयात धाव घेतली आहे. या लढ्याला प्राथमिक यश मिळाले असून, ज्येष्ठ विधिज्ञ अॅड. सतीश तळेकर यांच्या अभ्यासपूर्ण युक्तिवादानंतर मा. उच्च न्यायालयाच्या कोल्हापूर खंडपीठाने संबंधित प्रकरणात स्थगिती आदेश जारी केला आहे.
कुडाळ नगरपंचायतीच्या नावावर असलेल्या १४१ गुंठे जमिनीबाबत नगरपंचायतीने आपली भूमिका प्रभावीपणे मांडून ही जमीन परत मिळवण्यासाठी पुढाकार घ्यावा, या मागणीसाठी नागरिकांनी हा लढा उभारला आहे.
दि. १० जुलै २०२६ रोजी संध्या तेरसे यांनी नगरपंचायतीच्या नावे असलेली १४१ गुंठे जमीन लँड माफियांकडून गिळंकृत झाल्याचा आरोप करत, ती जमीन नगरपंचायतीला परत मिळावी यावर विचार करण्यासाठी विशेष सभा बोलवावी, या मागणीसाठी उपोषण केले होते. त्यानंतर झालेल्या विशेष सभेत नगरपंचायतीने दाखवलेल्या भूमिकेवरही नागरिकांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.
विशेष सभेत सन २०२४ मध्ये महाराष्ट्र महसूल न्यायाधिकरणात (MRT) नगरपंचायतीविरोधात लागलेल्या निकालाची प्रतदेखील सादर करण्यात आली नसल्याचा दावा नागरिकांनी केला आहे. निकालाची प्रत मागवून घेतल्यानंतरच उच्च न्यायालयात दावा दाखल करायचा की नाही, असा निर्णय नगरपंचायतीने बहुमताने घेतल्याचेही प्रसिद्धीपत्रकात नमूद करण्यात आले आहे.
निकाल नगरपंचायतीच्या विरोधात लागून दोन वर्षे उलटूनही पुढील कायदेशीर कार्यवाही करण्यात आली नाही, असा आरोप करत हिंदू कॉलनी रहिवासी आणि कुडाळ शहर हितचिंतकांनी अखेर नगरपंचायतीविरोधात उच्च न्यायालयात रिट पिटीशन दाखल केली. रिट पिटीशन क्रमांक ४३४२/२०२६ असून, दि. १० सप्टेंबर २०२६ रोजी उच्च न्यायालयाने नागरिकांची विनंती मान्य करत संबंधित आदेश दिल्याचे प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे.
या आदेशामुळे आता आपल्या हक्कासाठी नगरपंचायतीलाच प्रतिवादी म्हणून न्यायालयीन प्रक्रियेत उभे राहावे लागणार असल्याची भूमिका नागरिकांनी मांडली आहे.
या संपूर्ण प्रकरणातून सुजाण नागरिकांनी एकत्र येऊन आपल्या हक्कासाठी प्रामाणिकपणे लढा उभारला तर त्याला नक्कीच यश मिळू शकते, हे स्पष्ट झाले असल्याचे हिंदू कॉलनी रहिवासी आणि कुडाळ शहर हितचिंतकांनी म्हटले आहे. शासकीय मालमत्ता ही खऱ्या अर्थाने जनतेचीच मालमत्ता असल्याने तिच्या संरक्षणासाठी नागरिकांनी एकजुटीने पुढे येणे आवश्यक असल्याचेही त्यांनी नमूद केले.
या प्राथमिक न्यायालयीन यशाचे श्रेय कुडाळ शहराच्या भल्यासाठी एकत्र आलेल्या सर्वसामान्य नागरिकांच्या संघर्षाला, कष्टाला आणि एकजुटीला देण्यात आले आहे.
श्री देव कुडाळेश्वर आणि श्री साईबाबांच्या आशीर्वादाने मिळालेले हे प्राथमिक यश सर्व देवतांच्या चरणी अर्पण करत असून, कुडाळच्या हितासाठी सर्वसामान्य नागरिक या भूमिकेतून काम करणाऱ्यांना यापुढेही असेच पाठबळ मिळावे, यासाठी आम्ही नतमस्तक आहोत, अशी भावना नागरिकांनी व्यक्त केली.
या प्रकरणाबाबतची सविस्तर माहिती गणेशोत्सवानंतर पत्रकार परिषद घेऊन देण्यात येणार असल्याचे हिंदू कॉलनी रहिवासी आणि कुडाळ शहर हितचिंतकांनी स्पष्ट केले आहे. मात्र, उच्च न्यायालयाकडून मिळालेले हे प्राथमिक यश ही जनतेसाठी शुभवार्ता असल्याने ती तातडीने जनतेपर्यंत पोहोचवणे आवश्यक असल्याचेही त्यांनी म्हटले आहे.












