मुंबईत दुमदुमणार मालवणी लोककलेचा जल्लोष! २५ नोव्हेंबरला ‘मालवणी अभिमान मेळो’

कणकवली : छत्रपती शिवाजी महाराजांनी २५ नोव्हेंबर रोजी सिंधुदुर्ग किल्ल्याची पायाभरणी केली. ही तारीख ‘मालवणी अभिमान दिवस’ म्हणून साजरी करण्याच्या उद्देशाने मुंबईस्थित ‘जय थय मालवणी’ संस्थेच्या वतीने यंदापासून दरवर्षी २५ नोव्हेंबर रोजी ‘मालवणी अभिमान मेळा’ आयोजित करण्यात येणार आहे. यंदाचा पहिला मेळा मुंबईतील रवींद्र नाट्य मंदिर येथे होणार असून, त्याचे यजमान म्हणून आमदार प्रमोद जठार यांची निवड करण्यात आली आहे.

याबाबत ‘जय थय मालवणी’ संस्थेच्या वतीने रविवारी कणकवली शासकीय विश्रामगृह येथे पत्रकार परिषद घेण्यात आली. यावेळी आमदार प्रमोद जठार, संस्थेचे प्रमुख पदाधिकारी जयेंद्र साळगावकर, भाऊ कोरगावकर, रजनीश राणे आणि संजीव शिरसाट उपस्थित होते.

यावेळी आमदार प्रमोद जठार यांच्या हस्ते ‘मालवणी अभिमान मेळा’च्या बोधचिन्हाचे अनावरण करण्यात आले. हा मेळा प्रत्येक मालवणी माणसाचा असून सिंधुदुर्ग जिल्ह्यातील तसेच जिल्ह्याबाहेरील सर्व राजकीय नेते, पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी सहभागी होऊन मेळा यशस्वी करावा, असे आवाहन आयोजकांनी केले. सर्वपक्षीय मालवणी नेते, मंत्री, आमदार, खासदार, नगरसेवक, पदाधिकारी व कार्यकर्त्यांना सन्मानाने पाचारण करण्यात येणार असल्याचे आयोजकांनी सांगितले.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, सुनेत्रा पवार, सांस्कृतिक कार्यमंत्री आशिष शेलार, सिंधुदुर्गचे पालकमंत्री नितेश राणे, तसेच जिल्ह्यातील सर्व लोकप्रतिनिधींना या मेळ्यासाठी खास हक्काचे निमंत्रण देण्यात येणार असल्याचे आयोजकांनी सांगितले.

या मेळ्यात एका ज्येष्ठ कर्तृत्ववान मालवणी व्यक्तीला ‘जीवन गौरव’ पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे. विविध क्षेत्रांत उल्लेखनीय कामगिरी केलेल्या दोन मालवणी व्यक्तींना ‘मालवणी अभिमान’ पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहेत. दिवसभर विविध मालवणी कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले असून सिंधुदुर्गातील तब्बल ७० कलाकार लोककला सादर करणार आहेत. मेळ्याच्या प्रारंभी सिंधुदुर्ग किल्ल्यावरील पवित्र माती, पाणी आणि तटबंदीचा चिरा यांची जल्लोषात पालखी मिरवणूक काढण्यात येणार आहे. तसेच सिंधुदुर्गातील रील स्टार्सचा विशेष कार्यक्रम, ‘सिंधुदुर्ग विकास’ विषयावरील चर्चासत्र व परिसंवाद, कवी गुरु ठाकूर यांची मुलाखत आणि मालवणी कवी संमेलन होणार आहे.

मेळ्यात ‘मालवणी रत्न’ आणि ‘हा बघलास काय ता!’ अशी दोन दालने उभारण्यात येणार आहेत. ‘मालवणी रत्न’मध्ये सिंधुदुर्गातील १३० महान व्यक्तींचा जीवनपट मांडण्यात येणार आहे. तसेच ‘स्वर्गापेक्षा सुंदर असा’ फेम श्रीकृष्ण सावंत यांनी संगीतबद्ध केलेल्या आणि कवी महेश केळुसकर यांनी लिहिलेल्या ‘मालवणी अभिमान गीताचे’ प्रकाशन करण्यात येणार आहे.