
संजय पेटकर / कोकणशाही कणकवली : नादब्रह्म संगीत विद्यालयाच्या शिष्यवर्गातर्फे आयोजित करण्यात आलेला ‘स्वर पौर्णिमा’ हा सांगीतिक कार्यक्रम उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाला. या कार्यक्रमात विद्यालयातील विद्यार्थ्यांनी विविध गीत, शास्त्रीय संगीत व सांगीतिक रचनांचे उत्तम सादरीकरण करून उपस्थितांची दाद मिळवली.
कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून संगीत अलंकार श्री. संदीप पेंडूरकर सर , प्रा. शाहीर श्री. हरिभाऊ भिसे सर , नगरसेविका सौ. मेघा गांगण मॅडम तसेच रोटरी क्लब ऑफ कणकवलीच्या अध्यक्षा व नगरसेविका डॉ.सौ.सुप्रिया नलावडे मॅडम उपस्थित होत्या.
विद्यार्थ्यांनी आत्मविश्वासाने आणि सुरेलपणे केलेल्या सादरीकरणाचे मान्यवरांनी कौतुक केले. संगीत शिक्षणातून विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव मिळत असून अशा कार्यक्रमांमुळे त्यांच्या कलाविष्काराला व्यासपीठ उपलब्ध होत असल्याचे यावेळी नमूद करण्यात आले.
कार्यक्रमाचे निवेदन नादब्रह्म संगीत विद्यालयाचे संचालक श्री. श्रीधर पाचंगे यांनी प्रभावीपणे केले. कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी योगदान देणाऱ्या सर्वांचे आभार नादब्रह्म संगीत विद्यालयाच्या संचालिका सौ. नेत्रा प्रभुदेसाई-पाचंगे यांनी मानले.
विद्यार्थ्यांचे सुरेल सादरीकरण, मान्यवरांची उपस्थिती आणि रसिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद यामुळे ‘स्वर पौर्णिमा’ कार्यक्रम संस्मरणीय ठरला.












