तब्बल १९८ लाभार्थ्यांनी घेतला शिबिराचा लाभ
विनायक भारती प्रतिष्ठानचे संस्थापक रजत चव्हाण यांचे मानले आभार

राजेश हेदळकर / कोकणशाही कुडाळ : आपल्या लहानपणी कच्च्या रस्त्यांवरून धावणारी लालपरी आज कात टाकत असून आधुनिकतेचे रूप घेत आहे. या लालपरीने आपल्याला आईप्रमाणे साथ असून आज प्रत्येकाच्या दारासमोर गाडी असली तरी लालपरीबद्दलचा जिव्हाळा कमी झालेला नाही. असे प्रतिपादन हिर्लोक गावचे तलाठी संतोष बांदेकर यांनी केले. ग्रुप ग्रामपंचायत हिर्लोक – किनळोस आणि विनायक भारती प्रतिष्ठान यांच्या संयुक्त विद्यमाने NCMC कार्ड नोंदणी शिबिराचे आयोजन हिर्लोक येथे करण्यात आले होते. या कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी विनायक भारती प्रतिष्ठानच्या माध्यमातून २३०/- रुपये किमतीचे NCMC कार्ड ग्रामस्थांना मात्र ११५/- रुपयात उपलब्ध करून देण्यात आले. तर ग्राहकांचे उर्वरित ११५/- रुपये विनायक भारती प्रतिष्ठानच्या माध्यमातून भरण्यात आले.
या कार्यक्रमाच्या सुरवातीला अखंड महाराष्ट्राचे आराध्य दैवत श्री. छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून दीपप्रज्वलन करण्यात आले. यानंतर उपस्थित सर्व मान्यवरांचे शाल, श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले.
यानंतर उपसरपंच नरेंद्र राणे यांनी आपले मनोगत व्यक्त करताना विनायक भारती प्रतिष्ठानच्या या उपक्रमाचे कौतुक केले. यानंतर विनायक भारती प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष ऍड. रजत चव्हाण यांनी आपले विचार मांडले. आपल्या आई – वडिलांप्रमाणे गावातील ग्रामस्थांची सेवा करण्याची संधी मला मिळाली हे माझे भाग्य समजतो. असे ते यावेळी म्हणाले.
यानंतर सेवा शक्ती एस. टी. संघर्ष समितीचे महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष भरत चव्हाण यांनी NCMC कार्डबाबत असणारे अनेक गैरसमज दूर केले. येत्या १४ सप्टेंबर पर्यंत NCMC कार्ड काढण्यासाठी वेळ असून १४ ते ३० सप्टेंबरपर्यंत NCMC कार्ड काढल्याची पावती दाखवल्यास प्रवाशांना एस. टी. च्या सवलतींचा लाभ मिळणार आहे. यानंतर मात्र सर्व प्रवाशांसाठी हे कार्ड बंधनकारक करण्यात आले आहे. शिवाय संपूर्ण महाराष्ट्राचे नेटवर्क एका सर्वरवर अवलंबून असून त्यावर भार आल्यामुळे हे कार्ड काढताना अनेक अडचणी येत असल्याचे त्यांनी सांगितले. सुट्ट्या पैशांवरून वाहक आणि प्रवाशांमध्ये होणारा वाद यावर तोडगा म्हणून हे कार्ड असल्याचे त्यांनी यावेळी स्पष्ट केले.
यानंतर माजी सरपंच उदय सावंत यांनी या उपक्रमाचे कौतुक केले. विनायक भारती प्रतिष्ठानच्या माध्यमातून सवलतीच्या दरात NCMC कार्ड काढून मिळत असून सर्वांना या उपक्रमाचा लाभ घ्यावा असे आवाहन त्यांनी उपस्थितांना केले.
यावेळी पंचायत समिती सदस्य अश्विनी सावंत, सरपंच प्राची सावंत, उपसरपंच नरेंद्र राणे, प्रगतशील शेतकरी हरिश्चंद्र उर्फ बबन कदम, तंटामुक्ती अध्यक्ष विजय परब, माजी उपसरपंच मोहन परब, हिर्लोक सोसायटी अध्यक्ष पंढरीनाथ सावंत, उपाध्यक्ष विनोद सावंत, माजी उपसरपंच सूर्यकांत नाईक, गणेश चव्हाण, सीताराम परब, आदेश परब, संदीप सावंत, राघोबा परब हिर्लोक – किनळोस ग्रुप ग्रामपंचायतचे सर्व कर्मचारी व ग्रामस्थ उपस्थित होते.
यावेळी तब्बल १९८ लोकांनी या शिबिराचा लाभ घेतला असून एवढ्या सवलतीच्या दरात NCMC कार्ड काढून दिल्याबद्दल सर्वांनी विनायक भारती प्रतिष्ठानचे आभार मानले. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन तलाठी संतोष बांदेकर यांनी केले. तर आभार उपसरपंच नरेंद्र राणे यांनी मानले.












