सिंधुदुर्गच्या समुद्रात काळाचा घाला; दोघांचा बुडून मृत्यू, एकाला वाचविण्यात यश

मालवण : किल्ले सिंधुदुर्गच्या पाठीमागील खडकाळ समुद्रात आज पहाटे मासेमारीसाठी गेलेली ‘सागरिका’
(आयएनडी एमएच ५ एम एम १४८४) ही पात मोठ्या लाटेच्या तडाख्यामुळे उलटल्याची दुर्दैवी घटना सकाळी सात वाजण्याच्या दरम्यान घडली. या दुर्घटनेत दांडी येथील भाजपचे स्थानिक पदाधिकारी, मच्छिमार सन्मेष सुरेश परब (वय-४९) आणि अक्षय हनुमंत राणे (वय ३०) या दोघांचा बुडून दुर्दैवी मृत्यू झाला. तर सुयोग सन्मेष परब (वय- २२) या तरुणाला स्थानिक मच्छीमारांनी प्रसंगावधान दाखवत सुखरूप बाहेर काढले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, आज पहाटेच्या सुमारास सन्मेष परब, अक्षय राणे आणि सुयोग परब हे तिघे ‘सागरिका’ या मासेमारी पातीने किल्ले सिंधुदुर्ग लगतच्या समुद्रात गेले होते. सकाळी सात वाजण्याच्या सुमारास किल्ल्याच्या मागील बाजूस असलेल्या खडकाळ भागात अचानक आलेल्या एका मोठ्या लाटेच्या तडाख्यामुळे त्यांची पात समुद्रात पलटी झाली. पात उलटल्याने तिघेही समुद्रात फेकले गेले.
दरम्यान, सुयोग परब हा पाण्यात पोहत असताना जवळच असलेल्या जयदेव लोणे यांच्या नौकेतील मच्छीमारांच्या निदर्शनास आला. त्यांनी तातडीने सुयोगला आपल्या नौकेवर घेऊन त्याचा जीव वाचवला. मात्र, सन्मेष परब आणि अक्षय राणे हे दोघे समुद्राच्या पाण्याचा अंदाज न आल्याने बेपत्ता झाले.
घटनेची माहिती मिळताच स्थानिक मच्छीमारांनी तातडीने शोधमोहीम हाती घेतली. काही वेळातच सन्मेष परब यांचा मृतदेह किल्ल्यानजीकच्या समुद्रात आढळून आला, तर थोड्या वेळाने अक्षय राणे यांचाही मृतदेह शोधण्यात यश आले. मच्छीमारांनी दोन्ही मृतदेह किनाऱ्यावर आणले असून, शवविच्छेदनासाठी मालवण येथील ग्रामीण रुग्णालयात पाठवण्यात आले आहेत.
मृत सन्मेष परब हे दांडी येथील भाजपचे सक्रिय पदाधिकारी असून मालवणच्या माजी नगरसेविका सेजल परब यांचे पती होत. त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगा, मुलगी आणि बहिणी असा परिवार आहे. सन्मेष परब व अक्षय राणे यांच्या अचानक जाण्याने दांडी व मालवण शहर परिसरात तीव्र हळहळ व्यक्त केली जात असून शोककळा पसरली आहे.
घटनेची माहिती मिळताच सहायक पोलीस निरीक्षक गणेश माने, पोलीस उपनिरीक्षक एस. एस. खाडे, पोलीस कर्मचारी प्रदीप पाटील आणि करिश्मा चिंदरकर यांनी घटनास्थळी व रुग्णालयात भेट देऊन घटनेचा पंचनामा केला.
तसेच घटनेचे वृत्त समजताच ठाकरे शिवसेना तालुकाप्रमुख हरी खोबरेकर, शहरप्रमुख बाबी जोगी, रुपेश प्रभू, अन्वय प्रभू, नगरसेविका अन्वेषा आचरेकर, तात्या धुरी, नगरसेवक ललित चव्हाण, आना मोंडकर, सुजित मोंडकर, वसंत गावकर, दिलीप पराडकर, आनंद पराडकर, बाबू आचरेकर यांच्यासह अनेक लोकप्रतिनिधी व मच्छीमार बांधवांनी किनाऱ्यावर आणि रुग्णालयात धाव घेतली.