तुकोबांच्या विचारांची आजच्या काळाशी सांगड; ‘आजच्या काळासाठी तुकोबा’चे प्रकाशन

आजच्या तरुणांसाठी तुकोबाच खरा मार्गदर्शक – भरत यादव

ॲड. परुळेकर लिखित, प्रभा प्रकाशन प्रकाशित ‘आजच्या काळासाठी तुकोबा’ ग्रंथाच्या दुसऱ्या आवृत्तीचे प्रकाशन

प्रवीण बांदेकर, अमृता मोरे, सचिन परब यांची उपस्थिती

संजय पेटकर / कोकणशाही कणकवली
वारकरी परंपरेतील सकल संतांनी सर्वसामान्य माणसांच्या भाषेत जगण्याचे तसेच प्रेम-भक्तीचे साधे-सरळ तत्त्वज्ञान प्रभावीपणे मांडले. ह.भ.प. ॲड. देवदत्त परुळेकर लिखित – प्रभा प्रकाशन प्रकाशित ‘आजच्या काळासाठी तुकोबा’ हा ग्रंथ आजच्या तरुण पिढीला मार्गदर्शक असा आहे, असे प्रतिपादन नामवंत अनुवादक भरत यादव (सोलापूर) यांनी केले.
मालवण येथील नाथ पै सेवांगण आयोजित ‘रिंगण वारकरी वीकेण्ड’ कार्यक्रमात ‘आजच्या काळासाठी तुकोबा’ या ग्रंथाच्या दुसऱ्या आवृत्तीचे प्रकाशन भरत यादव, संत तुकाराम महाराजांच्या वंशज तथा ज्येष्ठ पत्रकार अमृता मोरे, कादंबरीकार प्रवीण बांदेकर, रिंगण परिवाराचे प्रमुख तथा ज्येष्ठ पत्रकार सचिन परब, श्री मांडवकर, उल्हास पाटील यांच्या उपस्थितीत करण्यात आले. यावेळी लेखक ॲड. देवदत्त परुळेकर, प्रभा प्रकाशनाचे संचालक कवी अजय कांडर आदी उपस्थित होते.
भरत यादव म्हणाले, “आजच्या काळात वारकरी परंपरेचा मानवतावादी विचार समाजात पुनःपुन्हा मांडण्याची गरज आहे. लोकप्रबोधनासाठी संतसाहित्य आजच्या काळातदेखील तितकेच उपयुक्त ठरते. परुळेकरांनी या पुस्तकामधून तुकोबांच्या वचनांचा अर्थ अतिशय सार्थपणे उलगडून सांगितला आहे. आजच्या तरुण पिढीला मार्गदर्शक ठरेल असे या पुस्तकातील सगळे लेखन आहे. उच्च निर्मितीमूल्ये असलेले हे पुस्तक प्रत्येक मराठी वाचकाने वाचावे असेच आहे. या अनोख्या ग्रंथनिर्मितीबद्दल लेखक ह.भ.प. देवदत्त परुळेकर आणि कवी, प्रकाशक अजय कांडर यांचे कौतुक करावे तेवढे थोडेच.”
‘आजच्या काळासाठी तुकोबा’ हा ग्रंथ अल्पावधीतच लोकप्रिय झाला आहे. यापूर्वी या ग्रंथावर विविध संस्थांतर्फे मालवण आणि आजरा येथे परिसंवादांचे आयोजन करण्यात आले होते. वृद्ध वाचकांपासून तरुणांपर्यंत हा ग्रंथ वाचला जात असून आता अल्प कालावधीतच त्याची दुसरी आवृत्ती प्रसिद्ध झाली आहे.