कणकवलीत गांजाविक्रीचा डाव उधळला; 1.798 किलो गांजासह दोघे ताब्यातकणकवलीत गांजाविक्रीचा डाव उधळला; 1.798 किलो गांजासह दोघे ताब्यात
संजय पेटकर / कोकणशाही कणकवली : कणकवली पोलिसांनी गांजाची खरेदी-विक्री करण्यासाठी आलेल्या दोघांवर कारवाई करत 1.798 किलो गांजा आणि दोन दुचाकी असा एकूण 1 लाख 80 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. यामध्ये एका विधिसंघर्षग्रस्त बालकाचा समावेश आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, 13 ऑगस्ट 2026 रोजी कणकवली पोलिस ठाण्याच्या हद्दीतील गांगो मंदिर ते गणपती साना जाणाऱ्या डांबरी रस्त्यालगत, टेंबवाडी येथील आम्रपाली सोसायटीजवळ काही इसम गांजाची विक्री करण्यासाठी येणार असल्याची गोपनीय माहिती पोलिसांना मिळाली.
या माहितीची वरिष्ठ अधिकाऱ्यांना कल्पना देऊन पोलिसांनी दोन पंच आणि प्रमाणित वजनकाटाधारकासह घटनास्थळी सापळा रचला. यावेळी सूर्यकांत राघो घाडीगावकर, वय 29 वर्षे, रा. वागदे देऊळवाडी, ता. कणकवली, तसेच एका विधिसंघर्षग्रस्त बालकाला पोलिसांनी ताब्यात घेतले.
संशयितांकडील मोपेड आणि मोटारसायकलची झडती घेतली असता दोन पारदर्शक प्लास्टिक पिशव्यांमध्ये हिरवट रंगाचा, उग्र वास असलेला गांजा आढळून आला. वजन केले असता प्लास्टिक पिशव्यांसह त्याचे वजन 1.798 किलो ग्रॅम इतके भरले.
या कारवाईत पोलिसांनी 60 हजार रुपये किमतीचा गांजा, 80 हजार रुपये किमतीची यमाहा फसिनो दुचाकी आणि 40 हजार रुपये किमतीची हिरो स्प्लेंडर दुचाकी, असा एकूण 1 लाख 80 हजार रुपयांचा मुद्देमाल ताब्यात घेतला.
ही कारवाई पोलीस अधीक्षक मोहन दहिकर आणि अपर पोलीस अधीक्षक नयोमी साटम यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक प्रवीण कोल्हे, पोलीस उपनिरीक्षक अनिल हाडळ तसेच एएसआय डॉमीनिक डिसोझा आणि पोलिस पथकाने केली.
गांजाची खरेदी-विक्री करणाऱ्या संशयितांवर केलेल्या या कारवाईमुळे कणकवली परिसरातील अमली पदार्थांच्या व्यवहाराला मोठा धक्का बसला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोलिसांकडून सुरू आहे.











