एसटी चालक-वाहकांना राखी बांधून नाथ पै ज्ञान प्रबोधिनीच्या विद्यार्थिनींचे अनोखे रक्षाबंधन

संजय पेटकर / कोकणशाही कणकवली : रक्षाबंधनाचा सण म्हणजे भाऊ-बहिणीच्या प्रेमाचे, आपुलकीचे आणि सुरक्षिततेचे नाते दृढ करणारा सण. याच भावनेतून नाथ पै ज्ञान प्रबोधिनी, करुळ येथील विद्यार्थिनींनी विद्यार्थ्यांची ने-आण करणाऱ्या एसटी बसच्या चालक व वाहकांना तसेच एसटी बसलाही राखी बांधून अनोख्या पद्धतीने रक्षाबंधन साजरे केले.
दररोज विद्यार्थ्यांना सुरक्षितपणे शाळेत आणणे व शाळा सुटल्यानंतर त्यांना त्यांच्या गावी सुखरूप पोहोचविण्याची जबाबदारी एसटी चालक व वाहक पार पाडतात. त्यांच्या या सेवाभावी कार्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी विद्यार्थिनींनी चालक व वाहकांच्या हातावर राखी बांधली. तसेच एसटी बसलाही राखी बांधून तिच्याप्रती कृतज्ञता व्यक्त केली. यावेळी विद्यार्थिनींनी चालक व वाहकांना औक्षण करून रक्षाबंधनाच्या शुभेच्छा दिल्या. या उपक्रमातून विद्यार्थ्यांमध्ये कृतज्ञता, बंधुभाव, सामाजिक बांधिलकी आणि सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेबद्दल आदर निर्माण करण्याचा संदेश देण्यात आला. यावेळी प्रशालेचे मुख्याध्यापक श्री लक्ष्मण नारकर, शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते..