कोकणच्या कलावंतांचा ‘सिरीयल किलर’ शतक महोत्सवी प्रयोग दिमाखात संपन्न!
- कोकणच्या मातीतील प्रतिभेचा मराठी रंगभूमीवर शतकी जल्लोष!
- सिंधुदुर्गचे नाट्यनिर्माते प्रणय तेली यांची शतकी भरारी!
निर्माते प्रणय तेली यांच्यासह संपूर्ण नाट्यसंघाचे मंत्री नितेश राणे यांच्याकडून विशेष कौतुक
मुंबई, प्रतिनिधी : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील नाट्यनिर्माते प्रणय तेली यांच्या सिंधुसंकल्प एंटरटेनमेंट प्रायव्हेट लिमिटेड निर्मित ‘सिरीयल किलर’ या फॅमिली कॉमेडी नाटकाचा शतक महोत्सवी प्रयोग रविवार, दिनांक २२ नोव्हेंबर २०२६ रोजी दादर येथील छत्रपती शिवाजी मंदिर नाट्यगृहात अत्यंत उत्साहात आणि रसिक प्रेक्षकांच्या भरघोस प्रतिसादात संपन्न झाला. महाराष्ट्र राज्याचे मत्स्यव्यवसाय व बंदरे विकास मंत्री तथा सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री ना. नितेश राणे यांच्या विशेष उपस्थितीत हा सोहळा पार पडला.
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील नाट्यनिर्माते प्रणय तेली यांनी या नाटकाच्या प्रवासाची सुरुवात दादर येथील छत्रपती शिवाजी मंदिर नाट्यगृहातच महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री नारायण राणे आणि सौ. नीलम राणे यांच्या उपस्थितीत केली होती. तसेच या नाटकाच्या पोस्टरचे अनावरण तत्कालीन महाराष्ट्र राज्याचे शालेय शिक्षण व मराठी भाषा मंत्री दीपक केसरकर यांच्या हस्ते करण्यात आले होते. ज्या नाट्यगृहातून या नाटकाच्या प्रवासाला सुरुवात झाली, त्याच नाट्यगृहात शतक महोत्सवी प्रयोग संपन्न होणे, ही संपूर्ण नाट्यसंघासाठी विशेष अभिमानाची बाब ठरली.
कोकणच्या कलावंतांचा विलक्षण योगायोग!
या नाटकाचे निर्माते प्रणय तेली, प्रमुख अभिनेते भाऊ कदम, लेखक व दिग्दर्शक केदार देसाई हे सर्व कोकणाशी नाळ जोडलेले आहेत. त्याचप्रमाणे नाटकातील बहुतांश कलाकार आणि पडद्यामागील तंत्रज्ञही कोकणातील आहेत. कोकणच्या मातीतील अनेक प्रतिभावंतांनी एकत्र येऊन मराठी व्यावसायिक रंगभूमीवर शंभर यशस्वी प्रयोगांचा टप्पा गाठणे, ही समस्त कोकणवासीयांसाठी गौरवास्पद बाब आहे. या नाटकाच्या सुरुवातीपासून शतक महोत्सवी प्रयोगापर्यंत लाभलेली कोकणातील नेतृत्वाची उपस्थिती हादेखील एक सुंदर योगायोग ठरला.
निर्माते प्रणय तेली यांच्या कार्याचे नितेश राणे यांच्याकडून कौतुक

शतक महोत्सवी प्रयोगानिमित्त बोलताना मंत्री नितेश राणे यांनी निर्माते प्रणय तेली यांच्या नाट्यक्षेत्रातील कार्याचे विशेष कौतुक केले.
“मराठी रंगभूमीवर आपल्या अभिनयाच्या आणि सादरीकरणाच्या माध्यमातून प्रेक्षकांचे मनोरंजन करत नाटकाला यशस्वीपणे १०० प्रयोगांचा टप्पा गाठून देणे ही निश्चितच कौतुकास्पद आणि अभिमानाची बाब आहे. एखादे नाटक १०० प्रयोगांचा टप्पा गाठते, तेव्हा त्यामागे कलाकारांचा कसदार अभिनय, दिग्दर्शकाचे कल्पक मार्गदर्शन, निर्मात्यांची मेहनत आणि पडद्यामागील प्रत्येक व्यक्तीचे योगदान असते,” असे मत नितेश राणे यांनी व्यक्त केले.
यावेळी त्यांनी नाटकाचे लेखक-दिग्दर्शक केदार देसाई, सुप्रसिद्ध अभिनेते भाऊ कदम, अभिनेत्री गायत्री दातार यांच्यासह संपूर्ण नाट्यसंघाच्या मेहनतीचे, कलात्मक दृष्टिकोनाचे आणि मराठी रंगभूमीवरील योगदानाचे मनापासून कौतुक केले. तसेच संपूर्ण नाट्यसंघाचे अभिनंदन करून पुढील यशस्वी वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.
मान्यवरांच्या उपस्थितीत कलाकारांचा गौरव

या नाटकाला ‘सिरीयल किलर’ हे समर्पक शीर्षक देणारे महाराष्ट्राचे सुप्रसिद्ध गीतकार गुरु ठाकूर आणि नाटकाचे संगीतकार विजय गवंडे यांची यावेळी विशेष उपस्थिती होती. त्यांच्यासह नाटकातील सर्व कलाकार आणि पडद्यामागील सहकाऱ्यांचा शतक महोत्सवी प्रयोगानिमित्त सन्मान करण्यात आला.
या सोहळ्यास ज्येष्ठ सूत्रसंचालक, पाध्ये पब्लिसिटीचे विजय पाध्ये, सुप्रसिद्ध अभिनेते शशांक शेंडे, सुप्रसिद्ध दिग्दर्शक सुनील भोसले, सौ.सई तेली सौ. श्रिया देसाई, सौ. ममता कदम, गौरेश तेली, ऋषिकेश तेली, आराध्य कदम यांच्यासह नाट्य, कला आणि सांस्कृतिक क्षेत्रातील अनेक मान्यवर तसेच नाट्यसंघाचे सहकारी उपस्थित होते.
भाऊ कदम, गायत्री दातार, गौरी देशपांडे आणि तेजस पिंगुळकर यांच्या अभिनयाने सजलेल्या या कौटुंबिक विनोदी नाटकाने रसिकांच्या मनात आपले विशेष स्थान निर्माण केले आहे.

सिंधुदुर्गातील एका नाट्यनिर्मात्याने कोकणातील कलावंतांना सोबत घेऊन मराठी व्यावसायिक रंगभूमीवर शंभर प्रयोगांचा यशस्वी टप्पा गाठला, ही कोकणच्या सांस्कृतिक वाटचालीतील एक अभिमानास्पद उपलब्धी आहे. रसिक प्रेक्षकांच्या उत्स्फूर्त प्रतिसादात आणि मान्यवरांच्या शुभेच्छांच्या साक्षीने ‘सिरीयल किलर’चा हा शतक महोत्सवी सोहळा संस्मरणीय ठरला.












