देवरुख बागवाडीत चोरट्यांचा धुमाकूळ! बंद घर फोडून साडेतीन लाखांचा ऐवज लंपास!

देवरुख : संगमेश्वर तालुक्यातील देवरुखनजीक बागवाडी येथे बंद घराला लक्ष्य करत अज्ञात चोरट्यांनी घरफोडी केली. घराचा मागील दरवाजा उचकटून आत प्रवेश केलेल्या चोरट्यांनी कपाटातील सोन्या-चांदीचे दागिने आणि रोख रक्कम असा एकूण ३ लाख ५१ हजार ९०० रुपयांचा मुद्देमाल चोरून नेला. ही घटना १० नोव्हेंबर रोजी उघडकीस आली.
याप्रकरणी योगिता रवींद्र फेफडे (वय ४०, मूळ रा. शिवणे, सध्या रा. श्रीराम नारायण कदम यांच्या घरी भाड्याने, बागवाडी, ता. संगमेश्वर) यांनी देवरुख पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे.

फिर्यादीनुसार, ३० ऑक्टोबर रोजी सायंकाळी ४.३० वाजल्यापासून ९ नोव्हेंबर रोजी सायंकाळी ५ वाजेपर्यंत संबंधित घर बंद होते. याच संधीचा फायदा घेत अज्ञात चोरट्यांनी घराच्या मागील बाजूचा दरवाजा कठीण हत्याराने उचकटून घरात प्रवेश केला. त्यानंतर हॉलमधील लोखंडी पत्र्याच्या कपाटाचे लॉकर तोडून आतील पत्र्याच्या डब्यात ठेवलेले सोन्या-चांदीचे दागिने आणि रोख रक्कम चोरून नेली.
चोरीस गेलेल्या ऐवजात ६० हजार रुपये किमतीचा सोन्याचा हार, ८० हजार रुपये किमतीचा १२ ग्रॅम वजनाचा सोन्याचा हार, २५ हजार रुपये किमतीचे कानातील सोन्याचे दागिने, तसेच चांदीचे पैंजण, बाली, जोडवी, मासोळी, वाटी, ब्रेसलेट आणि मनगट्या यांचा समावेश आहे. याशिवाय ५०० रुपयांच्या नोटांच्या स्वरूपातील १ लाख ७० हजार रुपयांची रोकडही चोरट्यांनी लंपास केली. अशा प्रकारे एकूण ३ लाख ५१ हजार ९०० रुपयांचा मुद्देमाल चोरीला गेला आहे.

या प्रकरणी १० नोव्हेंबर रोजी देवरुख पोलीस ठाण्यात गुन्हा रजिस्टर क्रमांक १७०/२०२६ नुसार भारतीय न्याय संहिता २०२३ मधील कलम ३३१(१), ३३१(३), ३३१(४) आणि ३०५ अन्वये अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. देवरुख पोलीस या घरफोडीचा तपास करत असून अज्ञात चोरट्यांचा शोध घेत आहेत.