चिरणी बौद्धवाडीच्या स्मशानभूमी रस्त्यासाठी १० लाखांचा निधी! आमदार प्रमोद जठारांच्या हस्ते भूमिपूजन

खेड : खेड तालुक्यातील मौजे चिरणी बौद्धवाडी येथील अनिल हळदे यांच्या घरापासून वरचीवाडी स्मशानभूमीपर्यंतच्या रस्त्याच्या डांबरीकरणासाठी विधानपरिषदेचे आमदार प्रमोद जठार यांनी आपल्या आमदार निधीतून १० लाख रुपयांचा निधी उपलब्ध करून दिला आहे. या विकासकामाचा भूमिपूजन समारंभ आमदार प्रमोद जठार यांच्या हस्ते उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला.
कार्यक्रमाच्या प्रारंभी आमदार प्रमोद जठार यांनी चिरणी बौद्धवाडी येथील बुद्धविहाराला भेट दिली. यावेळी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर, छत्रपती शिवाजी महाराज आणि तथागत भगवान गौतम बुद्ध यांच्या प्रतिमांना पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. याचवेळी भारत-पाकिस्तान युद्धात देशाच्या रक्षणासाठी अतुलनीय शौर्य गाजविणारे चिरणी गावचे सुपुत्र कै. सुधीर आंब्रे यांच्या स्मृतींना उजाळा देण्यात आला. त्यांच्या शौर्याचा गौरव म्हणून वीरचक्र अर्पण करून त्यांना भावपूर्ण आदरांजली वाहण्यात आली.
चिरणी बौद्धवाडीतील नागरिकांकडून या रस्त्याच्या डांबरीकरणाची मागणी अनेक दिवसांपासून करण्यात येत होती. वरचीवाडी स्मशानभूमीकडे जाणारा रस्ता सुस्थितीत असणे ही ग्रामस्थांची महत्त्वाची गरज लक्षात घेऊन आमदार प्रमोद जठार यांनी आमदार निधीतून १० लाख रुपये उपलब्ध करून दिले. त्यानुसार या कामाचा भूमिपूजन समारंभ पार पडला.
या रस्त्याचे डांबरीकरण पूर्ण झाल्यानंतर स्थानिक नागरिकांसह अंत्यविधीसाठी स्मशानभूमीकडे जाणाऱ्या ग्रामस्थांची गैरसोय दूर होण्यास मदत होणार आहे. त्यामुळे बौद्धवाडी परिसरातील नागरिकांना मोठा दिलासा मिळणार आहे. या कार्यक्रमाला रत्नागिरी उत्तर जिल्हाध्यक्ष सतीश मोरे, भाजपचे ज्येष्ठ नेते राजूभाई रेड्डीज, खेड तालुकाध्यक्ष विनोद चाळके, जिल्हा उपाध्यक्ष अविनाश आंब्रे, जिल्हा कोषाध्यक्ष जगदीमा आंब्रे, किशोर आंन्ने यांच्यासह चिरणी गावातील आजी-माजी सैनिक आणि बौद्धवाडीतील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
रस्त्याच्या डांबरीकरणासाठी निधी उपलब्ध करून दिल्याबद्दत ग्रामस्थांनी समाधान व्यक्त केले. विकासकामाचे भूमिपूजन महामानवांना अभिवादन आणि देशासाठी शौर्य गाजविणान्या वीरपुत्राच्या स्मृतींना वंदन अशा तीनही बाबींमुळे हा कार्यक्रम विशेष ठरला.