मुंबई : दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनाला 10 महिने पूर्ण झाली आहेत. त्यांच्या विमान अपघाती मृत्यूची अद्यापही चौकशी सुरू आहे. तर दोन दिवसांपूर्वीच शिवसेना (शिंदे गट) नेते रामदास कदम यांनी अजित पवारांच्या विमान अपघातप्रकरणी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष तथा खासदार सुनील तटकरे यांची चौकशी करण्यात यावी, अशी मागणी केली.
त्यामुळे अजितदादांच्या अपघातामागे तटकरेंचा हात असल्याचा आरोपच कदम यांनी केल्याने खळबळ उडाली. ज्यानंतर यामुळे मोठा वाद निर्माण झाला आहे. मात्र अशातच आता आज बुधवारी (11 नोव्हेंबर) भाऊबीज निमित्त खासदार सुप्रिया सुळे यांनी अजित पवारांसाठी केलेल्या पोस्टची चर्चा रंगली आहे.


भाऊबीज असो किंवा रक्षाबंधन किंवा कोणताही सण असो किंवा कार्यक्रम या निमित्ताने नेहमीच सर्व पवार कुटुंबीय कटुता विसरून एकत्र यायचे. मात्र, यंदाच्या वर्षी अजित दादांची उणीव कुटुंबीयांना भासत असल्याचे नेहमीच सोशल मीडियावरील पोस्टच्या माध्यमातून पाहायला मिळाले. तर आज भाऊबीजेनिमित्त खासदार सुप्रिया सुळे यांनी X या सोशल मीडिया साइटवर अजितदादांसाठी भावनिक पोस्ट लिहिली आहे. या पोस्टसोबत त्यांनी एक व्हिडीओ सुद्धा पोस्ट केला आहे. 1 मिनिटं 46 सेकंदाच्या या व्हिडीओमध्ये सुप्रिया सुळे आणि त्यांच्या सर्व बहिणी या अजित दादांना ओवाळतान पाहायला मिळत आहेत. हाच व्हिडीओ पोस्ट सुप्रिया सुळेंनी आपल्या भावासाठीच्या भावना व्यक्त केल्या आहेत. या व्हिडीओमध्ये अजित दादा आणि सुप्रिया सुळे यांचे काही फोटो सुद्धा जोडण्यात आले आहेत. तर शेवटच्या फोटोवर “मिस यू दादा!” असे लिहिण्यात आले आहे.

काय आहे सुप्रिया सुळेंची पोस्ट?
X या सोशल मीडिया साइटवर पोस्ट लिहित खासदार सुप्रिया सुळे यांनी लिहिले आहे की, “दादा, तुझ्याशिवायची ही पहिली दिवाळी आणि पहिली भाऊबीज. दरवर्षी या दिवसाची आम्हा सगळ्या बहिणींना किती ओढ असायची! यंदा मात्र भाऊबीजेचा दिवस उजाडला आणि आपल्या असंख्य आठवणींनी मनात गर्दी केली. आपलं एकत्र येणं, गप्पा, हसणं… आम्हा बहिणींच्या घोळक्यात हरखून गेलेला तू आजही डोळ्यांसमोर उभा राहतोस. तेव्हा अगदी सहज वाटणारे ते क्षण आज किती मोलाचे वाटतात. दादा, आजच्या दिवशी तुझं नसणं मनाला चटका लावून जातं. आम्हा सगळ्या बहिणींना तुझी किती आठवण येतेय, हे शब्दांत सांगणंही कठीण आहे. तू आमच्या मनात कायम आहेस आणि कायम राहशील ❤️” अशा भावना सुप्रिया सुळेंनी आपल्या पोस्टच्या माध्यमातून व्यक्त केल्या आहेत.












