सावंतवाडी : ओटवणे मांडवफातरवाडी येथील श्री सतीदेवी युवक कला क्रीडा मंडळ आणि संकल्प सेवा संघ यांच्या संयुक्त विद्यमाने शिवकालीन वारसा व शस्त्र प्रदर्शन तसेच गड किल्ले बांधणी स्पर्धेचा पारितोषिक वितरण सोहळा १५ नोव्हेंबर रोजी आयोजित करण्यात आला आहे. शिवकालीन वारसा व शस्त्र प्रदर्शन सायंकाळी ६ वाजता, तर गड किल्ले बांधणी स्पर्धेचा पारितोषिक वितरण सोहळा रात्री ८ वाजता सतीदेवी मंदिरच्या कै. नारायण (नाना) येसो वर्णेकर रंगमंचावर होणार आहे.
महाराष्ट्राचा गौरवशाली इतिहास, शिवकालीन वारशाची आणि पारंपरिक शस्त्र संस्कृतीची ओळख नव्या पिढीला व्हावी, या उद्देशाने शिवकालीन वारसा व शस्त्र प्रदर्शन आयोजित करण्यात आले आहे. या प्रदर्शनाच्या माध्यमातून शिवकालीन वारसा, पारंपरिक शस्त्रे आणि त्यांचे ऐतिहासिक महत्त्व जवळून पाहता व जाणून घेता येणार आहे. विद्यार्थी, युवक, महिला, ग्रामस्थ तसेच इतिहासप्रेमींसाठी हे प्रदर्शन आकर्षण ठरणार आहे. यासाठी दुर्ग मावळा प्रतिष्ठानचे सहकार्य लाभले आहे. किल्ले बांधणीची पारंपरिक संस्कृती जपणे, नव्या पिढीमध्ये महाराष्ट्राच्या गड-किल्ल्त्यांविषयी आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या गौरवशाली इतिहासाविषयी आवड निर्माण करणे, शिवकालीन वारशाची ओळख अधिक व्यापक स्वरुपात करून देणे, या उद्देशाने तीन वर्षे गड व किल्ले बांधणी स्पर्धेचे आयोजन करण्यात येत आहे. पारितोषिक वितरणात विजेत्या संघांचा गौरव करण्यात येणार असून सहभागी संघांना सहभाग प्रमाणपत्रे प्रदान केली जाणार आहेत. ग्रामस्थ, विद्यार्थी, युवक, महिला, इतिहासप्रेमींनी उपस्थित राहवे, असे आवाहन श्री सतीदेवी युवक कला क्रीडा मंडळ आणि संकल्प सेवा संघाने केले आहे.












