कुडाळ : शहरात मुख्य रस्त्याच्या बाजूला विनापरवाना फटाक्यांची विक्री करणाऱ्या एकावर कुडाळ पोलिसांनी कारवाई केली. ही कारवाई सोमवारी करण्यात आली असून संबंधित एकावर गुन्हा दाखल करण्यात आला. याबाबतची फिर्याद कुडाळ पोलीस ठाण्याचे हवालदार सखाराम भोई यांनी दिली.
कुडाळ शहरात कुडाळ पोलीस ठाण्याचे हवालदार सचिन गवस व सखाराम भोई गस्तीवर असताना मुख्य रस्त्याच्या बाजूला एका विक्रेत्याने दिवाळी सणानिमित्त कंदील व इतर शोभेच्या वस्तू विक्रीसाठी ठेवल्या होत्या. तसेच त्यासोबत त्याने फटाक्यांचे दुकान थाटले होते. त्या दुकानात फटाके विक्रीही करीत असल्याचे गस्तीवर असलेल्या पोलिसांच्या निदर्शनाला आले. त्या विक्रेत्याकडे चौकशी केली असता, त्यांच्याकडे फटाके विक्रीचा परवाना नसल्याचे स्पष्ट झाले.
पोलिसांनी १२ हजार ५०० रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला. तसेच विनापरवाना फटाक्यांची साठवणूक करून निष्काळजीपणे मानवी जीवितास धोका पोहोचेल, अशा प्रकारे फटाक्यांची विक्री करताना आढळल्याप्रकरणी भारतीय न्याय संहिता २०२३ कलम २८८ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला. या गुन्ह्याचा तपास पोलीस निरीक्षक विकास बडवे यांच्या मार्गदर्शनाखाली हवालदार सचिन गवस करत आहेत.












