शिवसेना शहर प्रमुख नगरसेवक अभिषेक गावडे यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून उदघाट्न.


कुडाळ : दिवाळी पाडवा २०२६ निमित्त कुडाळ शहर शिवसेना व युवा सेनेच्या वतीने नगर प्रदक्षिणा तसेच बैल व बैलगाड्यांच्या आकर्षक सजावट कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमाचे उद्घाटन शिवसेना कुडाळ शहरप्रमुख अभिषेक गावडे यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून करण्यात आले.
या उपक्रमाला कुडाळ शहरासह आजूबाजूच्या परिसरातील बैल मालकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. एकूण ३५ शेतकऱ्यांनी आपल्या सजवलेल्या बैलांसह व बैलगाड्यांसह या नगर प्रदक्षिणेत सहभाग घेतला. कुडाळ येथील गांधी चौकातून रॅलीला सुरुवात होऊन बाजारपेठ, शिवाजीनगर मार्गे जिजामाता चौक आणि तेथून पुन्हा गांधी चौक असा नगर प्रदक्षिणेचा मार्ग निश्चित करण्यात आला होता.
बैलांना पारंपरिक पद्धतीने सजवून तसेच बैलगाड्यांना आकर्षक सजावट करून सहभागी झालेल्या मालकांनी दिवाळी पाडव्याचा उत्साह द्विगुणित केला. रॅली पाहण्यासाठी नागरिकांनीही मोठ्या संख्येने उपस्थिती लावली. या उपक्रमातून कोकणातील शेतीसंस्कृती, बैलांप्रती असलेली कृतज्ञता आणि पारंपरिक सणांचे महत्त्व अधोरेखित झाले.
दिवाळी पाडव्याच्या निमित्ताने आयोजित करण्यात आलेल्या या नगर प्रदक्षिणेला बैल मालकांचा आणि नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाल्याने कार्यक्रम उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला.
यावेळी युवा सेना जिल्हाप्रमुख स्वरूप वाळके, नगरसेवक विलास कुडाळकर, उपशहरप्रमुख चेतन पडते, शाखाप्रमुख बंड्या काळप, राजाराम गडेकर, संदेश सावंत, विजय जाधव, अपु राणे, हाजीम मुजावर, दीपक सावंत, ओंकार माडवळ, नागेश राणे, आनंद पाचेकर, प्रशांत टेंबुलकर, बाबू टेंबुलकर, अम्मार मुजावर, आबा पावसकर, मंदार कोचरेकर, समीर परब, तुषार गुरव, दादू कुंभार, शुभम कुंभार आदी उपस्थित होते.












