काश्मीरमध्ये पुन्हा दहशतवादी हल्ला! दुचाकीवरून आलेल्या हल्लेखोरांचा CRPF जवानांवर गोळीबार

दक्षिण काश्मीरमधील कुलगाम येथे सुरक्षा दलांच्या गस्ती पथकावर दुचाकीवरून आलेल्या अज्ञात हल्लेखोरांनी गोळीबार केला. या घटनेत दोन जवान जखमी झाले आहेत

दक्षिण काश्मीरमधील कुलगाम जिल्ह्यात आज दुपारी सुरक्षा दलांच्या गस्ती पथकावर दुचाकीवरून आलेल्या अज्ञात हल्खोरांनी गोळीबार केला. या दहशतवादी हल्ल्यात केंद्रीय राखीव पोलीस दलाचे (CRPF) दोन जवान जखमी झाले आहेत. हा हल्ला दहशतवाद्यांनी केल्याचं वृत्त स्थानिक मीडियाकडून सूत्रांच्या हवाल्याने देण्यात आले आहे. हल्ल्यानंतर परिसराला जवानांनी वेढा घातला असून हल्लेखोरांचा शोध घेतला जात आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, आज दुपारी २:१५ वाजताच्या सुमारास कुलगाम येथील एका नाक्यावर तैनात असलेल्या
गस्ती पथकावर दुचाकीवरून आलेल्या अज्ञात हल्लेखोरांनी अचानक अंधाधुंद गोळीबार केला. त्यानंतर घटनास्थळावरून पळ काढला. या हल्ल्यात जखमी झालेल्या दोन्ही जवानांना तत्काळ उपचारासाठी अनंतनाग जिल्ह्यातील रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
हल्ल्यानंतर सुरक्षा दलांनी संपूर्ण परिसराला वेढा घातला आहे. पसार झालेल्या हल्खोरांचा शोध घेण्यासाठी शोधमोहीम सुरू करण्यात आली आहे.