दिवाळीनंतर महागाईचा आणखी एक झटका! अमूल-मदर डेअरीचे दूध महागले

मुंबई : नुकतेच दिवाळीचा सण संपला असून आता सर्वसामान्यांच्या खिशाला फटका बसण्याची शक्यता आहे. आता सर्वसामान्यांना दूध दरवाढीचे चटके सहन करावे लागणार आहेत. मदर डेअरीने दूधाचे दर वाढवल्यानंतर आता अमूलनेही देशभरात दुधाच्या दरात प्रतिलिटर 2 ते 4 रुपयांची वाढ जाहीर केली आहे.
ही दरवाढ गुरुवारपासून (12 नोव्हेंबर) लागू होणार आहे. यामुळे दुधाच्या किमती 4 ते 5 टक्क्यांनी वाढल्या आहेत. दरम्यान, मदरडेअरीने दुधाच्या दरात प्रतिलिटर 2 ते 6 रुपयांपर्यंत वाढ केली आहे.

दुधाच्या दरात वाढ करण्यामागे उत्पादन आणि प्रक्रिया खर्चात झालेली मोठी वाढ हे मुख्य कारण असल्याचे कंपनीने स्पष्ट केले आहे. चारा, जनावरांचे खाद्य, पॅकेजिंग साहित्य आणि इंधनाच्या दरात सातत्याने वाढ झाल्याने वाढत्या खर्चामुळेच दरवाढ करणे भाग पडल्याचे कंपनीने सांगितले आहे. ‘अमुल ताजा’ टोन्ड दुधाच्या दरात फक्त 2 रुपये प्रतिलिटर वाढ करण्यात आली आहे. तर, अमुल गोल्डच्या दरात प्रतिलिटर 4 रुपये वाढ झाली आहे. यापूर्वी अमूलने चालू वर्षातील मे महिन्यात प्रतिलिटर 2 रुपयांची दरवाढ केली होती.

बुधवारी (11 नोव्हेंबर) सकाळच्या सुमारास मदर डेअरीनेही उत्पादन खर्चातील वाढीचे कारण पुढे करत आपल्या विविध प्रकारच्या दुधाच्या दरात प्रतिलिटर 2 ते 6 रुपयांची वाढ जाहीर केली. ही नवी दरवाढही 12 नोव्हेंबरपासून लागू होत आहे. दिल्ली-एनसीआर परिसरातील सर्वात मोठी दूध पुरवठादार असलेल्या मदर डेअरीने फुल क्रीम, टोन्ड, डबल टोन्ड आणि गायीच्या दुधाचे दर वाढवले आहेत. मदर डेअरीने याआधी 14 मे 2026 रोजी दुधाचे दर वाढवले होते, तर त्यापूर्वी एप्रिल 2025 मध्ये दर सुधारित करण्यात आले होते.