मुंबई : दिवाळी संपल्यानंतर महाराष्ट्रातील हवामानात मोठा बदल होण्याचे संकेत हवामान विभागाने वर्तविले आहेत. राज्यातील बहुतांश भागांत पुढील काही दिवस हवामान कोरडे राहण्याचा अंदाज भारतीय हवामान विभाग आणि प्रादेशिक हवामान केंद्र, मुंबई यांनी वर्तवला आहे.
पुढील 4 ते 5 दिवसांत किमान तापमानात 2 ते 3 अंश सेल्सिअसने घट होण्याची शक्यता आहे. त्यामुळे पहाटे आणि रात्री थंडीचा अनुभव येईल. पण, दुपारच्या वेळेस मात्र उन्हाचा चटका कायम राहणार आहे.
पश्चिम किनारपट्टीवरील मुंबई, ठाणे, पालघर आणि रायगड जिल्ह्यांत हवामान कोरडे राहण्याची शक्यता आहे. मुंबईत सकाळी धुके आणि दिवसभर निरभ्र आकाश राहण्याचा अंदाज आहे. कमाल तापमान 32 ते 36 अंश, तर किमान तापमान 20 ते 24 अंश सेल्सिअसच्या आसपास राहू शकते. त्यामुळे पहाटे आणि रात्री थंडीचा अनुभव येईल. तर, दुपारच्या वेळी नागरिकांना उकाड्याचा त्रास जाणवू शकतो. पुण्यात कमाल तापमान 32 अंश, तर किमान तापमान 15 अंश सेल्सिअस राहण्याचा अंदाज आहे. त्यामुळे सकाळी आणि रात्री गारवा जाणवेल. सातारा, सांगली, कोल्हापूर आणि अहिल्यानगर जिल्ह्यांतही हवामान कोरडे राहील.
नागपुरात कमाल तापमान 30 ते 34 अंशांपर्यंत वाढण्याचा अंदाज आहे. अमरावती, अकोला, वर्धा, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर आणि गडचिरोली जिल्ह्यांतही कोरडे हवामान राहील. त्यामुळे शेतकऱ्यांना कापणी आणि पिकांची वाळवणी करण्यासाठी अनुकूल वातावरण मिळणार आहे. नाशिकमध्ये दिवसा उन्हाचा चटका, तर रात्री हलका गारवा जाणवेल. छत्रपती संभाजीनगर, जालना, बीड, लातूर, धाराशिव, परभणी, हिंगोली आणि नांदेड या मराठवाड्यातील जिल्ह्यांतही पावसाचा कोणताही इशारा देण्यात आलेला नाही. एकूणच, राज्यात सध्या पावसाने विश्रांती घेतली असून तापमानातील चढ-उतार कायम राहणार आहेत. त्यामुळे नागरिकांना सकाळी आणि रात्री थंडी, तर दुपारी उष्णतेचा सामना करावा लागण्याची शक्यता आहे.












