अपघातांचा धोका वाढला, प्रशासनाचे दुर्लक्ष! आता रस्त्यावर उतरणार नागरिक

दोडामार्ग : तिलारी ते वीजघर या रस्त्याचे काम अर्धवट स्थितीत असून अनेक ठिकाणी रस्ता खोदून ठेवल्याने वाहनधारकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. अनेक अपघातांच्या घटनाही घडल्या. वारंवार सूचना देऊनही संबंधित विभागाकडून कोणतीही दखल घेतली जात नसल्याने अखेर प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी गुरुवार, १२ नोव्हेंबरला रास्ता रोको आंदोलन छेडण्याचा इशारा स्वराज्य सरपंच सेवा संघाचे सिंधुदुर्ग जिल्हाध्यक्ष प्रवीण नारायण गवस यांनी दिला आहे. याबाबतचे निवेदन त्यांनी दोडामार्ग पोलिस निरीक्षकांना दिले आहे. दरम्यान, आंदोलनादरम्यान उद्भवणाऱ्या परिस्थितीची सर्वस्वी जबाबदारी संबंधित विभागाची राहील, असा इशाराही गवस यांनी दिला आहे.