ऐन दिवाळीत महाडवर शोककळा! ग्रामसेवकाचा जंगलात मृतदेह; गर्भवती पत्नी आणि चिमुकल्यावर दुःखाचा डोंगर!

रायगड : रायगड जिल्ह्यातील महाड तालुक्यात दहिवड आणि वाळण गावांच्या हद्दीतील जंगलपरिसरात ग्रामसेवकाचा मृतदेह आढळून आल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. महाड तालुक्यातील पंदेरी गावात ग्रामसेवक म्हणून कार्यरत असणारे गजानन गाढवे यांचे मूळ गाव मेहकर तालुका, जिल्हा बुलढाणा येथील आहे. नोकरीनिमित्त ते तालुक्यातील शिरगाव येथे वास्तव्यास होते.

एमआयडीसी पोलीस ठाण्याचे अधिकारी कर्मचारी घटनास्थळी दाखल
महाड औद्योगिक वसाहतीच्या पोलिसांकडून मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, गजानन गाढवे हे आपले कामकाज आवरून महाडकडे परतत असताना दहिवड आणि वाळण गावांच्या हद्दीतील रस्त्यालगत स्वतःची दुचाकी उभी करून जंगलाच्या दिशेने गेले होते. त्यानंतर जंगल परिसरात त्यांचा मृतदेह आढळून आला. या घटनेची माहिती मिळताच महाड एमआयडीसी पोलीस ठाण्याचे अधिकारी आनंद रावडे आणि कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले.

कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही
पोलिसांनी घटनास्थळाची पाहणी करून मृतदेह ताब्यात घेतला. त्यानंतर मृतदेह शवविच्छेदनासाठी महाड ग्रामीण रुग्णालयात पाठविण्यात आला आहे. प्राथमिक माहितीनुसार आत्महत्येचा संशय व्यक्त केला जात असला, तरी मृत्यूचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही.

ग्रामसेवक गजानन गाढवे यांच्या अचानक झालेल्या मृत्यूमुळे महाड तालुक्यात हळहळव्यक्त होत आहे. या घटनेमागील नेमके कारण काय, याबाबत विविध चर्चा सुरू आहेत. दरम्यान, महाड एमआयडीसी पोलीस ठाण्याच्या वतीने या प्रकरणाचा पुढील तपास सुरू असून, शवविच्छेदन अहवाल आणि पोलीस तपासानंतरच मृत्यूचे नेमके कारण स्पष्ट होणार आहे. या प्रकरणाचा अधिक तपास महाड एमआयडीसी पोलीस निरीक्षक आनंदरावडे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.

दरम्यान मृतदेहाजवळ एक कीटकनाशकाची बाटली मिळाली असून हे कीटकनाशक प्राशन करूनच हे आत्महत्या करण्यात आल्याचा प्राथमिक अंदाज पोलीस सूत्रांनी वर्तवला आहे. या ग्रामसेवकाचे पश्चात दोन जीवांची असलेली पत्नी व एक आठ वर्षाचा मुलगा असं कुटुंब असून अन्य कुटुंब गावाकडे असल्याची प्राथमिक माहिती पोलीस तपासात समोर आली आहे.