कुडाळमध्ये जिल्हास्तरीय काव्यलेखन आणि काव्यवाचन स्पर्धेचे आयोजन; कवींना सहभागाचे आवाहन!

कुडाळ : नवोदित आणि हौशी कवींना आपल्या साहित्यिक प्रतिभेला व्यासपीठ मिळावे, या उद्देशाने सिंधुदुर्ग जिल्हा ग्रंथालय संघाच्या वतीने जिल्हास्तरीय काव्यलेखन आणि काव्यवाचन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे.

या स्पर्धेत सहभागी होऊ इच्छिणाऱ्या कवींनी आपली स्वलिखित कविता येत्या ३० नोव्हेंबरपर्यंत पाठवायची आहे. कविता जास्तीत जास्त २० ओळींची असणे आवश्यक आहे. कवितेसोबत स्पर्धकांनी आपला संपूर्ण पत्ता आणि मोबाईल क्रमांक नमूद करणे बंधनकारक आहे.

कविता टपालाने किंवा प्रत्यक्ष कार्यालयात आणून देता येणार आहे. मात्र, व्हॉट्सॲपद्वारे कविता स्वीकारल्या जाणार नाहीत. कविता सिंधुदुर्ग जिल्हा ग्रंथालय संघाच्या नावे रावबहादूर अनंत शिवाजी देसाई वाचनालय, कुडाळ-बाजारपेठ या पत्त्यावर पाठवाव्यात.

स्पर्धेसाठी आलेल्या कवितांमधून केवळ २५ कवितांची निवड करण्यात येणार आहे. निवड झालेल्या कवींना प्रत्यक्ष काव्यवाचन स्पर्धेत सहभागी होऊन आपली कविता सादर करण्याची संधी मिळणार आहे. या स्पर्धेतील प्रथम पाच क्रमांकाच्या विजेत्यांना रोख पारितोषिक आणि प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात येणार आहे.

दरम्यान, विडंबनात्मक, राजकीय, धार्मिक तेढ निर्माण करणाऱ्या किंवा टीकाटिप्पणी करणाऱ्या कविता स्पर्धेसाठी स्वीकारल्या जाणार नाहीत.

अधिक माहितीसाठी स्पर्धेचे कार्यवाह राजन पांचाळ यांच्याशी ९४२३०२६७३५ या क्रमांकावर संपर्क साधावा.

जिल्ह्यातील कवींनी मोठ्या संख्येने या स्पर्धेत सहभागी होऊन आपल्या काव्यप्रतिभेला व्यासपीठ मिळवावे, असे आवाहन सिंधुदुर्ग जिल्हा ग्रंथालय संघाच्या वतीने करण्यात आले आहे.

कोकणातील साहित्यप्रेमी आणि नवोदित कवींसाठी ही एक उत्तम संधी ठरणार आहे.