सिंधुदुर्गात पहिल्यांदाच मोठी क्रीडा पर्वणी! १३ नोव्हेंबरपासून राज्य ज्युदो स्पर्धा!

सावंतवाडी : आंबोली पब्लिक स्कूल व विद्यानिकेतन, आंबोली येथे १३ ते १५ नोव्हेंबर या कालावधीत ५३ व्या राज्यस्तरीय सब ज्युनियर ज्युदो स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. या स्पर्धेसाठी राज्यभरातील ३५० हून अधिक ज्युदोपटू सहभागी होणार आहेत.
महाराष्ट्र राज्य ज्युदो असोसिएशनतर्फे पुनीत बालन ग्रुप प्रस्तुत ५३ व्या महाराष्ट्र राज्य सब ज्युनिअर ज्युदो स्पर्धा व राष्ट्रीय निवड चाचणी स्पर्धा १३ ते १५ नोव्हेंबर रोजी आंबोली पब्लिक स्कूल व विद्यानिकेतन, आंबोली येथे आयोजित करण्यात आली आहे. या राज्यस्तरीय ज्युदो स्पर्धेच्या पूर्वतयारीच्या अनुषंगाने महाराष्ट्र ज्युदो असोसिएशनचे अध्यक्ष शैलेश टिळक व महासचिव दत्ता आफळे यांच्या मार्गदर्शनानुसार सिंधुदुर्ग जिल्हा असोसिएशनची बैठक आंबोली पब्लिक स्कूल येथे नुकतीच झाली.
या असोसिएशनचे सचिव दत्तात्रय मारकड यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या बैठकीला असोसिएशनचे खजिनदार अभिजीत शेट्ये, स्पर्धा संयोजक चंद्रकांत शिंदे, सोनू जाधव, शैलेश सावंत (आंबोली), मंगेश घोगळे, दिनेश जाधव, शिवम म्हात्रे (सावंतवाडी), अजिंक्य पोफळे (फोंडाघाट), नीलेश फोंडेकर (करुळ) यांच्यासह जिल्ह्यातील प्रशिक्षक उपस्थित होते.