आरोंद्यात बेकायदेशीर गौणखनिज वाहतुकीवर पोलिसांचा छापा; ३ लाखांचा डंपर आणि ५० हजारांची खनिज माती जप्त!

सावंतवाडी तालुक्यातील आरोंदा परिसरात बेकायदेशीर गौणखनिज वाहतुकीविरोधात सावंतवाडी पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे. मध्यरात्रीच्या सुमारास आरोंदा ते रेडी या मार्गावर विनापरवाना गौणखनिजाची वाहतूक करणारा डंपर पोलिसांनी जप्त केला आहे. या कारवाईत सुमारे ५० हजार रुपये किमतीची खनिज माती आणि ३ लाख रुपये किमतीचा डंपर असा एकूण साडेतीन लाखांचा मुद्देमाल पोलिसांनी ताब्यात घेतला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, गुरुवारी मध्यरात्री डंपरमधून बेकायदेशीरपणे गौणखनिजाची वाहतूक होत असल्याची माहिती सावंतवाडी पोलीस ठाण्याला मिळाली होती. त्यानंतर ठाणे अंमलदारांनी ही माहिती आरोंदा दूरक्षेत्राला दिली.

या माहितीच्या आधारे पोलीस कर्मचारी संदीप झेंडे आणि त्यांच्या पथकाने आगराळवाडी येथील पेट्रोल पंपाजवळ संशयित डंपरची तपासणी केली. यावेळी डंपर चालक सचिन सुरेश राणे याने डंपर मालकाकडे वाहतुकीचा परवाना असल्याचे सांगितले.

मात्र, डंपर पोलीस ठाण्यात आणून तपासणी केली असता कोणत्याही प्रकारची अधिकृत परवानगी नसल्याचे समोर आले. त्यामुळे पोलिसांनी डंपर आणि त्यातील खनिज माती जप्त केली.

या प्रकरणी डंपर चालक सचिन सुरेश राणे (वय ४२, रा. रेडी) याच्याविरोधात सावंतवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

दरम्यान, गौणखनिजाची विनापरवाना वाहतूक करणाऱ्यांविरोधात पोलिसांनी केलेल्या या कारवाईमुळे परिसरात खळबळ उडाली असून, बेकायदेशीर खनिज वाहतुकीला आळा घालण्यासाठी प्रशासनाकडून अशाच प्रकारच्या कारवाया सुरू राहणार का, याकडे नागरिकांचे लक्ष लागले आहे.