सिंधुदुर्ग : कसाल हेदुळ खोटले वायंगवडे मार्गावरील साईट पट्टी धोकादायक बनत आहे. रस्त्याच्या बाजूला वाढलेल्या झाडी झुडपे
यामुळे वाहन चालक आणि पादचारी हैराण झाले आहेत. रस्त्याच्या साईट पट्टीवर वाढलेले प्रचंड गवत रस्त्यावर येत असल्याने वाहन चालवताना कसरत करावी लागत आहे. यामुळे संबंधित प्रशासनाने याकडे तातडीने तक्ष देऊन रस्त्याच्या कडेला वाढलेले गवत आणि झाडी साफ करावी अशी मागणी नागरिक तसेच वाहनचालकांकडून केली जात आहे. वाढलेल्या गवतामुळे अनेक ठिकाणी रस्त्याच्या कडेला अडथळे निर्माण झाले आहेत. काही ठिकाणी गवत थेट रस्त्यावर येत असल्याने समोरून येणाऱ्या वाहनांचा अंदाज घेणे बाजूने कठीण होत आहे. या भागातील बऱ्याच रस्त्यांवरून शालेय मुले ये जा करत असतात त्याचप्रमाणे अरुंद रस्त्यावरून प्रवास करताना वाहन चालकांना विशेष काळजी घ्यावी लागत असून पादचाऱ्यांना रस्त्यावरून चालणे अवघड झाले आहे संभाव्य अपघात टाळण्यासाठी रस्त्याच्या साईट पट्ट्या मोकळ्या असणे आवश्यक आहे. यामुळे संबंधित ग्रामपंचायती, सार्वजनिक बांधकाम विभाग तसेच रस्त्याच्या देखभालीची जबाबदारी असलेल्या प्रशासनाने तातडीने रस्त्याच्या बाजूला वाढलेली गवत आणि झाडी झुडपे साफ करावी रस्त्याची नियमितपणे साफसफाई करावी अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.












