प्रतिनिधी : श्री. प्रशांत रेवणकर / कोकणशाही वेंगुर्ला : हिंदू संस्कृतीत गायीला आणि वासराला अनन्यसाधारण महत्त्व असून, गोमातेप्रती कृतज्ञता व्यक्त करण्याचा सण म्हणजे वसुबारस. याच पार्श्वभूमीवर आज दिनांक ५ नोव्हेंबर २०२६ रोजी श्री शेतकरी गट, कालवी यांच्या वतीने जिल्हा परिषद पूर्ण प्राथमिक शाळा, केळूस-कालवी येथे सामूहिक वसुबारस अर्थात गो-वत्स पूजन कार्यक्रम उत्साहात आयोजित करण्यात आला.
या कार्यक्रमाला वेंगुर्ला पंचायत समितीचे उपसभापती सचिन देसाई, सदस्य आपी फणसेकर, जिल्हा परिषद सदस्या सौ. यज्ञा साळगावकर, केळूस ग्रामपंचायतीचे सरपंच योगेश शेट्ये, सदस्य महेश नागवेकर, लक्ष्मण वराडकर, मानसी कुडव यांची प्रमुख उपस्थिती होती.
तसेच सहाय्यक कृषी अधिकारी जीवन परब, पंचायत समिती पशुधन विभागाचे अधिकारी डॉ. म्हापणकर, कोचरा येथील पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. उमेश पेंडुरकर, कालवी पोलीसपाटील सौ. मृणाली राऊळ, अंगणवाडी सेविका किरण रेवणकर, आशा सेविका सौ. सुचिता केळूसकर यांच्यासह तळी-बोवला व कालवी परिसरातील शेतकरी आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
या कार्यक्रमाचे विशेष आकर्षण म्हणजे पशुधन विभागाच्या वतीने शेतकऱ्यांना जनावरांच्या चाऱ्यासाठी मका बियाण्यांचे वाटप करण्यात आले. या उपक्रमामुळे पशुपालक शेतकऱ्यांना जनावरांसाठी हिरवा चारा उपलब्ध करून देण्यास मदत होणार आहे.
दरम्यान, जिल्हा परिषद सदस्या सौ. यज्ञा साळगावकर यांनी उपस्थित मान्यवर, शेतकरी आणि ग्रामस्थांना गाय-वासराच्या प्रतिमा तसेच दिवाळीनिमित्त उटणे भेट देऊन सन्मानित केले.
पारंपरिक सणांचे महत्त्व जपत शेतकरी आणि पशुपालकांच्या हिताचे उपक्रम राबविणारा हा सामूहिक वसुबारस कार्यक्रम उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला. धार्मिक परंपरेसोबतच शेतकऱ्यांच्या उपयोगी उपक्रमांची जोड देणारा हा उपक्रम परिसरात कौतुकाचा विषय ठरला.












