कुडाळ : वन्यप्राण्यांच्या अवयवांची बेकायदेशीर तस्करी करणाऱ्या तिघांना सावंतवाडी वनविभागाच्या पथकाने कुडाळ बस डेपो परिसरात सापळा रचून अटक केली. त्यांच्याकडून वाघाचा दात, बिबट्याची नखे आणि सोन्यात मढवलेले सुळे जप्त करण्यात आले असून, यात वेंगुर्ला एसटी डेपोच्या एका शिपायाचा समावेश असल्याने जिल्ह्यात मोठी खळबळ उडाली आहे. मंगळवारी दिनांक ३ नोव्हेंबर २०२६ रोजी दुपारी ही धडक कारवाई करण्यात आली.
रोहिदास हरिश्चंद्र कामत वय वर्ष ४७, राहणार कामतवाडी, वायंगणी, तालुका वेंगुर्ला, व्यवसायः एसटी शिपाई , विजय रविकांत शिंदे वय वर्ष ३१, राहणार मुळदे, तालुका कुडाळ आणि मुनाफ इस्माईल मुकादम वय वर्ष ४०, राहणार अनपूर, विजयदुर्ग, तालुका देवगड) अशी ताब्यात घेण्यात आलेल्या तिघांची नावे आहेत.
मिळालेल्या गोपनीय माहितीनुसार, उपवनसंरक्षक मिलीश शर्मा व किरण जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली आणि डॉ. सुनील लाड यांच्या नेतृत्वाखालील पथकाने सोमवारी दुपारी वेंगुर्ला आणि नंतर कुडाळ बस डेपो परिसरात सापळा रचून तिघांना ताब्यात घेण्यात आले. अंगझडतीदरम्यान त्यांच्याकडून वाघाचा १ दातसुळा, बिबट्याची २ नखे आणि सोन्यामध्ये मढवलेले वन्यप्राण्याचे २ सुळेदात असा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
हा सर्व मुद्देमाल वन्यजीव संरक्षण अधिनियम १९७२ मधील अनुसूची १ अन्वये संरक्षित वन्यप्राण्यांच्या शिकारीशी संबंधित असल्याचे निष्पन्न झाले आहे. या प्रकरणी नेरुर तर्फ हवेली, वनपाल यांनी गुन्हा नोंदवला आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यात वन्यप्राण्यांच्या शिकारीविरोधात वनविभागाने मोहीम तीव्र केली असून, अशा प्रकारच्या तस्करीची माहिती असल्यास नागरिकांनी पुढे यावे, असे आवाहन प्रभारी उपवनसंरक्षक किरण जगताप यांनी केले असून माहिती देणाऱ्याचे नाव गुप्त ठेवण्यात येईल, असे स्पष्ट केले आहे.
दोघांना वनकोठडी, एकाला न्यायालयीन कोठडी
तिन्ही संशयितांना कुडाळ न्यायालयात हजर केले असता, न्यायालयाने रोहिदास कामत आणि विजय शिंदे यांना दोन दिवसांची वन कोठडी, तर मुनाफ मुकादम याला न्यायालयीन कोठडी सुनावली आहे.












