




कणकवली : भारतीय जनता पार्टी, कणकवली पुरस्कृत दिवाळी बाजाराचे उद्घाटन मंत्री मत्यव्यवसाय व बंदरे, महाराष्ट्र राज्य पालकमंत्री नितेश राणे यांच्या हस्ते उत्साहात संपन्न झाले. भाजपचे माजी कणकवली नगराध्यक्ष समीर नलावडे आणि पक्षातील सहकाऱ्यांनी एकत्रितपणे सुरू केलेला हा उपक्रम गेल्या आठ वर्षांपासून सातत्याने राबवला जात आहे. या माध्यमातून स्थानिक व्यावसायिकांना प्रोत्साहन देण्याबरोबरच महिला बचत गटांतील महिलांच्या कलागुणांना आणि उद्योजकतेला हक्काचे व्यासपीठ उपलब्ध करून दिले जात आहे. महिलांनी स्वतःच्या मेहनतीतून आणि कौशल्यातून तयार केलेल्या विविध वस्तू या बाजारात विक्रीसाठी मांडल्या आहेत.
या बाजारपेठेत होणारा प्रत्येक व्यवहार स्थानिक अर्थव्यवस्थेला बळकटी देणारा आहे. स्थानिक विक्रेते, छोटे व्यावसायिक आणि महिला बचत गटांना हक्काची बाजारपेठ उपलब्ध करून देण्याचा हा उपक्रम निश्चितच कौतुकास्पद आहे. अशा उपक्रमांमुळे स्थानिक रोजगार, महिला सक्षमीकरण आणि स्वावलंबनाला चालना मिळते. आगामी काळात कणकवली भाजपचा हा दिवाळी बाजार सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या आर्थिक विकासाला निश्चितच हातभार लावेल, असा विश्वास आहे.
या उद्घाटन सोहळ्याला भाजप जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत, राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष अबीद नाईक, महिला जिल्हाध्यक्षा श्वेता कोरगावकर यांच्यासह नगरसेविका मेघा गांगण, सुप्रिया नलावडे, प्रतीक्षा सावंत, मेघा सावंत, मनस्वी ठाणेकर, आर्या राणे, गणेश ऊर्फ बंडू हर्णे, संजय कामतेकर, राकेश राणे, स्वप्निल ऊर्फ दादू राणे, माजी नगराध्यक्ष समीर नलावडे, कलमठ सरपंच संदीप मेस्त्री, बंडू गांगण, सागर राणे, पप्पू पुजारे, तालुकाध्यक्ष मिलिंद मेस्त्री, शहराध्यक्ष अण्णा कोदे, गौतम खुडकर, समीर प्रभुगावकर, अभिषेक नाडकर्णी, लक्ष्मण घाडीगांवकर, अभय राणे, रंजन राणे, अमोल रासम, सभापती हर्षदा वाळके, जिल्हा परिषद सदस्या सुप्रिया मेस्त्री, सुप्रिया पाटील, शीतल दळवी आदी मान्यवर उपस्थित होते.











