मुंबईतील नाहूरमध्ये एका लग्नसोहळ्यात जेवण केल्यानंतर नवविवाहित दांपत्यासह तब्बल २७ जणांना अन्नातून विषबाधा झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. जेवणानंतर काही वेळातच पाहुण्यांना उलट्या, जुलाब आणि अपचनाचा त्रास सुरू झाला.
या घटनेमुळे लग्नात आलेल्यांमध्ये एकच खळबळ उडाली. त्यानंतर त्रास होत असलेल्या पाहुण्यांना तातडीने उपचारासाठी महापालिकेच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
घटना घडल्यानंतर बाधितांना भांडुपच्या पालिकेच्या रुग्णालयात हलवण्यात आले. रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी डॉ. कैलास मारस्कोले यांनी दिलेल्या माहितीनुसार, रविवारी रात्री ११:४० च्या सुमारास रुग्णांना रुग्णालयात आणण्यात आले. यामध्ये ११ महिला, ९ पुरुष आणि दोन लहान मुलांचा समावेश होता. महत्त्वाची बाब म्हणजे नवविवाहित वधू-वरालाही विषबाधा झाली.
“सर्व रुग्णांना जेवणानंतर उलट्या, जुलाब आणि अपचनाचा त्रास सुरु झाला होता. सध्या सर्व २७ रुग्णांची प्रकृती स्थिर असून त्यांच्यावर योग्य ते वैद्यकीय उपचार सुरू आहेत,” असे डॉ. मारस्कोले यांनी सांगितले.
नवरदेवाच्या नातेवाईकांचा कॅटरर्सवर गंभीर आरोप
या घटनेनंतर नवरदेवाच्या एका नातेवाईकाने कॅटरिंगच्या कामावर आणि जेवणाच्या दर्जावर संताप व्यक्त केला. नातेवाईकाने सांगितले की, “माझ्या मेहुण्याचे हे लग्न होते. सगळा कार्यक्रम आटोपून घरी परतल्यानंतर अचानक घरातील महिलांची प्रकृती बिघडू लागली. हळूहळू सुमारे ३० ते ४० लोकांना असाच त्रास सुरू झाला. हा फूड पॉयझनिंग प्रकार होता. कॅटरिंगच्या कर्मचाऱ्यांनी अन्नात काहीतरी खराब पदार्थ वापरले किंवा ते वाढले, ज्यामुळे अशी घटना घडली.”
पीडित कुटुंबाने या प्रकरणात कडक कारवाई करण्याची मागणी केली आहे. महाराष्ट्र अन्न व औषध प्रशासनाचे आयुक्त तुकाराम मुंढे तसेच मुंबई पोलिसांकडे या निष्काळजीपणाची चौकशी करून दोषींवर तात्काळ कारवाई करावी अशी मागणी नातेवाईकांनी केली आहे.











