कुडाळ : ग्रामीण भागातील महिला बचतगट, शेतकरी आणि स्थानिक उद्योजकांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्याच्या दृष्टीने कुडाळ येथे ‘सेवा संकल्प अभियान’ अंतर्गत शेतीमाल व खाद्यपदार्थांच्या वाहतुकीसाठी आठ वाहनांचे वाटप करण्यात आले. आमदार निलेश राणे यांच्या हस्ते लाभार्थ्यांना या वाहनांचे वाटप उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाले.

कुडाळ पंचायत समिती, ‘उमेद’ – महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान, सिंधुदुर्ग आणि महाराष्ट्र राज्य खादी व ग्रामोद्योग मंडळ, सिंधुदुर्ग यांच्या संयुक्त विद्यमाने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
या उपक्रमामुळे लाभार्थ्यांना शेतीमाल तसेच खाद्यपदार्थांची वाहतूक करणे अधिक सुलभ होणार असून, त्यांच्या व्यवसायाला चालना मिळण्यास मदत होणार आहे. ग्रामीण भागातील उत्पादनांना बाजारपेठ मिळवून देण्यासाठी आणि स्थानिक स्तरावर रोजगार व उत्पन्नाच्या संधी निर्माण करण्यासाठी हा उपक्रम महत्त्वपूर्ण ठरणार आहे.
या कार्यक्रमाला जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष दादा साईल, कुडाळचे अध्यक्ष मिलिंद नाईक, काका कुडाळकर, जिल्हा परिषद सदस्या दीपालक्ष्मी पडते, दीपक नारकर, रूपेश कांडे यांच्यासह संबंधित विभागांचे अधिकारी, पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.
यावेळी उपस्थित मान्यवरांनी सर्व लाभार्थ्यांचे अभिनंदन करत त्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.
ग्रामीण अर्थव्यवस्थेला बळकटी, स्थानिक उत्पादनांना बाजारपेठ आणि रोजगाराच्या नव्या संधी निर्माण करण्याच्या दिशेने कुडाळमधील ‘सेवा संकल्प अभियान’ हा उपक्रम महत्त्वपूर्ण ठरणार आहे.












