रायगडच्या तळा तालुक्यात बिबट्याची दहशत; वनविभागाकडे बंदोबस्ताची मागणी

रायगड : जिल्ह्यातील तळा तालुक्यातील कुंबळे येथे बिबट्याने धुमाकूळ घातला असून एका शेतकऱ्याच्या गोठ्यात बांधलेल्या गाईचा फडशा पाडल्याची थरारक घटना घडली आहे. या घटनेमुळे कुंबळे परिसरात शेतकऱ्यांमध्ये प्रचंड दहशत निर्माण झाली आहे.

वनविभागाने या बिबट्याचा बंदोबस्त करावा, अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे.

कुंबळे येथील शेतकरी रवींद्र बालुगडे यांनी मंगळवारी सायंकाळी आपली गुरे नेहमीप्रमाणे गोठ्यात बांधून ठेवली होती. बुधवारी पहाटे ते गुरे सोडण्यासाठी गोठ्यात गेले असता गाईवर बिबट्याने हल्ला करून तिला ठार मारल्याचे त्यांना दिसले. वनविभागाच्या पथकाने घटनास्थळी धाव घेऊन पाहणी केली, पंचनामा केला.

नुकसानग्रस्त शेतकऱ्याला भरपाई
याआधी ताम्हणे आणि गणेशनगर परिसरात रात्रीच्या वेळी नागरिकांना बिबट्या दिसला होता तर जंगलात एक वासरू मृतावस्थेत आढळले होते. मात्र आता थेट गावालगतच्या गोठ्यात शिरून बिबट्याने गाईवर हल्ला केल्याने शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. दरम्यान नुकसानग्रस्त शेतकऱ्याला भरपाई मिळावी, अशी मागणी करण्यात आली आहे.