२०० हून अधिक नागरिकांनी घेतला लाभ; मोफत चष्मे वाटप आणि एलईडी बल्ब प्रशिक्षण उपक्रम उत्साहात संपन्न


देवगड : समाजातील गरजू घटकांना आरोग्यसेवेचा लाभ मिळवून देण्यासोबतच कौशल्य प्रशिक्षणाच्या माध्यमातून स्वावलंबनाला चालना देण्याच्या उद्देशाने स्वावलंबन कौशल्य सेवा फाउंडेशन, देवगड यांच्या वतीने आयोजित मोफत आरोग्य तपासणी व नेत्र तपासणी शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. जामसंडे येथील सांस्कृतिक भवन येथे मंगळवारी झालेल्या या उपक्रमात २०० हून अधिक नागरिकांनी सहभागी होत विविध आरोग्यसेवा व उपक्रमांचा लाभ घेतला.
या शिबिरात दिव्यांग व्यक्ती, निराधार महिला, आणि ज्येष्ठ नागरिकांसह परिसरातील नागरिकांनी सहभाग घेतला. शिबिराच्या माध्यमातून सामान्य आरोग्य तपासणी, रक्तदाब व मधुमेह तपासणी, ईसीजी तपासणी तसेच आवश्यकतेनुसार पुढील वैद्यकीय तपासण्यांसाठी मार्गदर्शन करण्यात आले. नेत्र तपासणीसह गरजू लाभार्थ्यांना मोफत चष्म्यांचे वाटप करण्यात आले. समाजातील गरजू घटकांपर्यंत आरोग्यसेवा पोहोचविण्याच्या दृष्टीने हा उपक्रम महत्त्वपूर्ण ठरला.
आरोग्यसेवेबरोबरच रोजगाराभिमुख कौशल्य विकासालाही या कार्यक्रमात प्राधान्य देण्यात आले. एलईडी बल्ब बनविण्याच्या मोफत प्रशिक्षणाच्या माध्यमातून सहभागी लाभार्थ्यांना बल्बचे विविध भाग, जोडणी प्रक्रिया आणि प्रत्यक्ष निर्मिती याबाबत मार्गदर्शन करण्यात आले. कमी खर्चात एलईडी बल्ब तयार करण्याचे कौशल्य आत्मसात करून स्वयंरोजगाराच्या संधी निर्माण व्हाव्यात, हा या प्रशिक्षणामागील प्रमुख उद्देश होता.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी स्वावलंबन कौशल्य सेवा फाउंडेशनचे अध्यक्ष श्री. शैलेश नारकर होते. यावेळी नगरसेविका व पाणीपुरवठा सभापती सौ. तन्वी चांदोस्कर, ज्येष्ठ नागरिक संघ, देवगडचे अध्यक्ष डॉ. गणेश बांदकर आणि नगरसेवक श्री. विशाल मांजरेकर उपस्थित होते.
स्वावलंबन कौशल्य सेवा फाउंडेशनच्या वतीने आरोग्यसेवा, सामाजिक बांधिलकी आणि कौशल्य विकास यांचा समन्वय साधत समाजातील गरजू घटकांसाठी हा उपक्रम राबविण्यात आला. २०० हून अधिक नागरिकांचा सहभाग आणि लाभार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद यामुळे शिबिराला चांगले यश मिळाले. आरोग्यसेवेच्या माध्यमातून सामाजिक आधार आणि कौशल्य प्रशिक्षणातून स्वावलंबनाची संधी उपलब्ध करून देण्याचा फाउंडेशनचा प्रयत्न या उपक्रमातून अधोरेखित झाला.











