वन्य हत्तींना खाद्य देऊ नका! सावंतवाडी वन विभागाचा नागरिकांना इशारा

ओरोस : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सावंतवाडी आणि दोडामार्ग तालुक्यांत वन्य हत्तींचा वावर वाढत असल्याच्या पार्श्वभूमीवर नागरिकांनी सतर्क राहण्याचे आवाहन सावंतवाडी वन विभागाने केले आहे. हत्तींना केळी, ऊस, नारळ किंवा अन्य खाद्यपदार्थ देणे, त्यांच्याजवळ जाऊन छायाचित्रे व व्हीडिओ काढणे तसेच त्यांचा पाठलाग करणे टाळावे. अशा कृतींमुळे मानवी जीविताला धोका निर्माण होण्याबरोबरच मानव-हत्ती संघर्षाची शक्यता वाढू शकते, असा इशारा वन विभागाने दिला आहे.
वन्य हत्ती है संरक्षित वन्य प्राणी असल्याने त्यांना जाणूनबुजून त्रास देणे, त्यांच्या पिल्लांजवळ जाणे किवा त्यांच्या नैसर्गिक हालचालींमध्ये अडथळा आणणे टाळावे. विशेषतः सोशल मीडियासाठी रील्स, सेल्फी किंवा व्हीडिओ बनविण्याच्या नादात हत्तींच्या जवळ जाणे धोकादायक ठरू शकते. हत्ती रस्ता ओलांडत असताना सुरक्षित अंतरावर थांबून त्यांना मार्ग मोकळा करून द्यावा. वाहनांमधून त्यांचा पाठलाग करणे किंवा त्यांना घेरण्याचा प्रयत्न करू नये. हत्तींना खाद्य दिल्यामुळे ते मानवी वस्तीजवळ अन्नाच्या शोधात येण्याची शक्यता वाढते. त्यामुळे नागरिकांनी त्यांना आकर्षित करणाऱ्या कृती टाळून त्यांच्या नैसर्गिक अधिवासात मुक्तपणे वावरू द्यावे. वन्य हत्ती दिसल्यास त्यांना स्वतःहून हुसकावण्याचा प्रयत्न न करता तात्काळ जवळच्या वन कार्यालयाला किवा वन कर्मचाऱ्यांना माहिती द्यावी. वन्यजीव संरक्षण अधिनियम, १९७२ मधील लागू तरतुदींनुसार वन्यजीवविषयक गुन्ह्यांसाठी कायदेशीर कारवाई होऊ शकते. त्यामुळे नागरिकांनी वन विभागाच्या सूचनांचे पालन करून वन्यजीव संरक्षणासाठी सहकार्य करावे, असे आवाहन सावंतवाडी वन विभागाच्या उपवनसंरक्षकांनी केले आहे.