देवगड : तालुक्यातील पर्यटन विकासाला नवी दिशा देण्यासाठी आणि स्थानिक युवकांना गावातच स्वयंरोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने गुरुवार, २९ ऑक्टोबर रोजी देवगडमध्ये युवकांसाठी विशेष चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले आहे. ‘पर्यटन वाढवूया, देवगड घडवूया’ या संकल्पनेतून होणाऱ्या या चर्चासत्रात देवगडच्या पर्यटन क्षेत्रातील संधी, स्थानिकांचा सहभाग आणि युवकांच्या रोजगाराचे प्रश्न यांवर चर्चा होणार आहे.
देवगड तालुक्याला निसर्गरम्य समुद्रकिनारे, सुंदर खाड्या, ऐतिहासिक पर्यटन स्थळे आणि प्रसिद्ध धार्मिक स्थळांचा समृद्ध वारसा लाभला आहे. मात्र, पर्यटनाच्या बाबतीत देवगड अद्याप मालवण आणि वेंगुर्ल्याच्या तुलनेत अपेक्षित उंची गाठू शकलेला नाही. या पार्श्वभूमीवर तालुक्यातील पर्यटन क्षमता विकसित करून स्थानिक अर्थव्यवस्थेला चालना देण्याची गरज अधोरेखित केली जात आहे.
सध्या अनेक युवक शहरातील नोकऱ्या सोडून आपल्या गावी परतत आहेत. कुटुंबासोबत राहून गावातच व्यवसाय उभा करण्याची त्यांची इच्छा आहे. मात्र, पर्यटन व्यवसाय सुरू करताना विविध अडचणींचा सामना करावा लागत आहे. अशा परिस्थितीत राजकीय मतभेद बाजूला ठेवून स्थानिक युवक, ग्रामस्थ आणि पर्यटन व्यावसायिकांनी एकत्र येण्याची गरज या चर्चासत्राच्या माध्यमातून मांडण्यात येणार आहे.
या चर्चासत्रात देवगडमधील पर्यटन व्यवसायाच्या उपलब्ध संधी, ग्रामस्थ आणि इच्छुक पर्यटन व्यावसायिक यांच्यात समन्वय कसा साधता येईल, किनारी भागात पारंपरिक मच्छीमारांचे हित जपत पर्यटन व्यवसायाचा विकास कसा करता येईल, तसेच स्थानिक युवकांनी गावातच राहून व्यवसाय सुरू करण्यासाठी कोणत्या उपाययोजना करता येतील, अशा महत्त्वपूर्ण विषयांवर विचारमंथन होणार आहे.
स्थानिकांचा सहभाग, युवकांना रोजगार आणि पर्यटनाला चालना या उद्दिष्टांवर भर देत, गावातील चांगल्या उपक्रमांना पाठबळ देण्याचे आवाहन करण्यात येत आहे. पर्यटन विकासातून स्थानिकांना रोजगार, लघुव्यवसायांना संधी आणि देवगडच्या अर्थव्यवस्थेला नवी उभारी मिळू शकते. त्यासाठी सर्वांनी एकत्र येऊन सकारात्मक भूमिका घेणे आवश्यक असल्याचा संदेश या उपक्रमातून देण्यात येत आहे.
चर्चासत्राचा तपशील :
- दिनांक : गुरुवार, २९ ऑक्टोबर २०२६
- वेळ : सायंकाळी ५ वाजता
- स्थळ : शासकीय विश्रामगृह, पवनचक्की रोड, देवगड
देवगडच्या पर्यटन विकासासाठी आणि स्थानिक युवकांच्या उज्ज्वल भविष्यासाठी तालुक्यातील युवकांनी या चर्चासत्रात सहभागी व्हावे, असे आवाहन करण्यात आले आहे.











