
सिंधुदुर्गनगरी : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सागरी पर्यटनाला आंतरराष्ट्रीय स्तरावर नवी ओळख देणाऱ्या ‘आयएनएस गुलदार अंडरवॉटर म्युझियम’ प्रकल्पाला केंद्र सरकारचा मानाचा ‘गोल्डन बनियन अवॉर्ड’ जाहीर झाला आहे. नवी दिल्लीत मंगळवार २७ ऑक्टोबर २०२६ रोजी पार पडलेल्या भव्य सोहळ्यात केंद्रीय पर्यटन मंत्री गजेंद्र सिंह शेखावत यांच्या हस्ते हा राष्ट्रीय पुरस्कार प्रदान करण्यात आला.
एमटीडीसीचे व्यवस्थापकीय संचालक निलेश गटणे, सिंधुदुर्गच्या जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे व प्रादेशिक अधिकारी दिलीप माने यांनी हा सन्मान स्वीकारला. ‘द वीक हेरिटेज अवॉर्ड्स २०२६’ मध्ये ‘बेस्ट इनोव्हेशन’ आणि ‘बेस्ट क्रिएटिव्ह कॅम्पेन’ या दोन श्रेणींमध्ये सिंधुदुर्गच्या या महत्त्वाकांक्षी प्रकल्पाने बाजी मारली आहे.
भारतीय नौदलात ३८ वर्षे सेवा बजावलेली निवृत्त ‘आयएनएस गुलदार’ युद्धनौका निवती रॉक्स परिसरात समुद्राखाली बुडवून तिथे कृत्रिम प्रवाळभित्ती आणि संग्रहालय उभारले जात आहे. एमटीडीसी आणि भारतीय नौदलाच्या सहकार्याने सुमारे ४६.९१ कोटी रुपये खर्चुन हा प्रकल्प साकारला जात आहे. या ऐतिहासिक प्रकल्पामुळे स्कूबा डायव्हिंग, स्नॉर्कलिंग आणि साहसी सागरी पर्यटनाला मोठी चालना मिळून कोकणच्या पर्यटन वैभवात मानाचा तुरा रोवला गेला आहे.
सागरी जैवविविधतेचे संवर्धन करणाऱ्या या प्रकल्पामुळे स्थानिक पातळीवर रोजगाराच्या नव्या संधी उपलब्ध होणार आहेत. मार्च २०२८ पर्यंत हा प्रकल्प पूर्ण करण्याचे नियोजन असून, पुढील १० वर्षांत किमान ८०० तरुणांना प्रत्यक्ष रोजगार मिळण्याचा अंदाज प्रशासनाने व्यक्त केला आहे. देशातील अशा प्रकारच्या पहिल्याच उपक्रमामुळे सिंधुदुर्ग जागतिक पर्यटन नकाशावर अधिक ठळकपणे उदयास येणार आहे. ऐतिहासिक युद्धनौकेच्या अवशेषांचा पर्यटन आणि सागरी जीवसृष्टी वाढवण्यासाठी असा अनोखा वापर संपूर्ण देशासाठी कौतुकाचा विषय ठरला आहे.












