कुडाळ : महाराष्ट्र वीज कंत्राटी कामगार संघ (संलग्न भारतीय मजदूर संघ) यांच्या माध्यमातून सिंधुदुर्ग जिल्ह्यातील महावितरणच्या कंत्राटी कामगारांनी बुधवारी कुडाळ येथील अधीक्षक अभियंता कार्यालयासमोर एक दिवसीय धरणे आंदोलन केले. ६ नोव्हेंबरपर्यंत मागण्या मान्य न झाल्यास ऐन दिवाळीत काम बंद आंदोलन करून राज्यभर ‘दिवाळी अंधारात’ घालविण्याचा इशारा कंत्राटी कामगार संघटनेने दिला आहे.
महाराष्ट्र वीज कंत्राटी कामगार संघाच्यावतीने या कंत्राटी कामगारांच्या विविध प्रलंबित मागण्यासाठी महाराष्ट्र राज्यभर बुधवारी एकदिवसीय धरणे आंदोलने करण्यात आली. याच पार्श्वभूमीवर, कुडाळ येथे या संघटनेचे जिल्हाध्यक्ष संदीप बांदेकर यांच्या नेतृत्वाखाली धरणे आंदोलन करण्यात आले. यात सरचिटणीस संजय गोवेकर, कार्याध्यक्ष सचिन राघव, कोषाध्यक्ष रामचंद्र राऊळ, संघटन मंत्री सर्वेश राऊळ, तालुकाध्यक्ष रुपेश जाधव, बापू देसाई, योगराज यादव, गणेश देऊलकर, दर्शन देसाई, अभय जोशी, बळीराम गावकर, महादेव बोभाटे, त्रिमूर्ती सडेकर, तसेच तालुका पदाधिकारी बाबाजी गावडे, जितेंद्र परब, मनीष राणे, सुधीर तेली, आबा कापडोस्कर, सतीश जंगले यांच्यासह शेकडो कामगार उपस्थित होते.
सरकारच्या ‘कौशल्य बोर्ड पॅटर्न प्रमाणे महाराष्ट्रातही कॉन्ट्रॅक्टर-लेस’ (कंत्राटदारमुक्त) प्रणाली लागू करावी, ही या संघटनेची मुख्य मागणी आहे.












