सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेच्या कामवाटप प्रक्रियेत काही व्यक्तींकडून विनाकारण हस्तक्षेप होत असल्याचा गंभीर प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी नेरूर देऊळवाडा जि.प. मतदारसंघाचे सदस्य श्री. रूपेश अशोक पावसकर यांनी थेट अति. मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद सिंधुदुर्ग यांना पत्र लिहून कोणत्याही दबावाला बळी न पडता झालेले कामवाटप कायम ठेवण्याची ठाम मागणी केली आहे.सचिव कामवाटप समिती सुशिक्षित बेरोजगार अभियंता / मजूर सहकारी संस्था तथा कार्यकारी अभियंता (बांधकाम) जि.प. सिंधुदुर्ग यांच्याकडील १३/१०/२०२६ च्या सूचनेनुसार, दिनांक १५/१०/२०२६ रोजी नियमानुसार कामे वाटप करण्यात आली होती. मात्र, कोणतीही ठोस व कायदेशीर कारण नसताना या कामवाटपास स्थगिती देण्याबाबत काही आसामींकडून (व्यक्तींकडून) हस्तक्षेप होत असल्याचे निदर्शनास आले आहे.या प्रकाराची गंभीर दखल घेत जि.प. सदस्य रूपेश पावसकर यांनी पत्राद्वारे प्रशासनाला तडाखा दिला आहे. कोणत्याही दबावाला बळी न पडता सदरचे कामवाटप कायम ठेवावे, असे त्यांनी स्पष्ट केले आहे. तसेच, जर दबावाखाली येऊन या कामवाटपास स्थगिती देण्यात आली, तर याप्रकरणी न्यायालयात दाद मागण्यात येईल, असा इशाराही त्यांनी प्रशासनाला दिला आहे.












